37
आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून निराश्रित अनुसयाबाई गोरडे यांना व्हिलचेअर प्रदान!
परतवाडा/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
परतवाडा: अचलपूर तालुक्यातील बोर्डी येथील ‘श्री संत गजानन महाराज वृद्ध सेवाश्रमात’ राहणाऱ्या निराश्रित आई अनुसयाबाई गोरडे यांना माजी आमदार श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून ‘तेजांकुर बहुउद्देशीय संस्था, परतवाडा’ यांच्या वतीने गुरुवारी व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. या सामाजिक उपक्रमामुळे वाढत्या वयामुळे चालणे अशक्य झालेल्या अनुसयाबाईंना मोठा आधार मिळाला आहे.
वृद्ध सेवाश्रमात राहणाऱ्या अनुसयाबाई गोरडे यांचे वाढत्या वयामुळे पाय थकल्याने त्यांना दोन्ही हातांचा वापर करून जमिनीवर सरपटत चालावे लागत होते. ही बाब समजताच आ. बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने तेजांकुर बहुउद्देशीय संस्थेने तातडीने मदतीचा हात पुढे केला. प्रत्यक्ष व्हिलचेअर हाती मिळताच आणि त्यावर बसल्यानंतर आई गोरडे अत्यंत भावूक झाल्या होत्या.
व्हीलचेअर सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी तेजांकुर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व नाट्यअभिनेत्री अपूर्वाताई सोनार, सचिव, सत्यशोधक लेखक व रंगकर्मी जयकुमार चर्जन, बोर्डी येथील प्रसिद्ध समाजसेवी डॉ. अंबाडकर आणि शीतल मडद्ये आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अपूर्वाताई सोनार आणि जयकुमार चर्जन यांनी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या सर्वसामान्य व गरजूंसाठी असलेल्या संवेदनशील कार्याचा गौरव करत त्यांचे विशेष आभार मानले.
वृद्धाश्रमाचे संचालक संजय शाहाकार यांनी माहिती दिली की, बोर्डी येथील हा वृद्ध सेवाश्रम पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन मेटकर यांच्या विशेष सहकार्याने व दातृत्वातून चालविला जातो. अशा कठीण प्रसंगात संस्थेने दिलेली मदत अत्यंत मोलाची असल्याचे सांगत संचालक संजय शाहाकार यांनी उपस्थितांचे व तेजांकुर संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

