मूर्तीजापुरात घराच्या वादातून रक्ताचा सडा! पतीसह चिमुकल्या मुलीवर चाकूने हल्ला; हिरापूर येथील घटनेने खळबळ
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २८ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तीजापूर : तालुक्यातील हिरापूर येथे घराच्या हिश्शाच्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी घरातील कर्त्या पुरुषासह मध्यस्थीसाठी आलेल्या चिमुकल्या मुलीवरही चाकूने सपासप वार करून जखमी केले. याप्रकरणी मूर्तीजापूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी सौ. रेखा मंगेशराव जोगी (वय ४०, रा. हिरापूर) आणि त्यांचे कुटुंब जेवण करून घरी बसले होते. यावेळी आरोपी श्रीकृष्ण गादे आणि सुनीता गादे हे तिथे आले आणि घराच्या वाटणीवरून वाद घालू लागले. फिर्यादीच्या पतीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, वादाचे रूपांतर झटापटीत झाले.
झटापटीदरम्यान आरोपी श्रीकृष्ण गादे याने फिर्यादीच्या पतीचा हाताचा अंगठा तोंडात धरून जोरात चावा घेतला, तर आरोपी सुनीता गादे हिने त्यांचे हात पकडून ठेवले. याचवेळी तिसरा आरोपी राम श्रीकृष्ण गादे याने घरातून चाकू आणला आणि फिर्यादीच्या पतीच्या दोन्ही हातांवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
वडिलांना वाचवण्यासाठी त्यांची मुलगी कु. आराध्या ही मध्यस्थी करण्यास गेली असता, नराधम आरोपी राम याने तिच्याही डाव्या हाताच्या पंजावर चाकू मारून तिला जखमी केले. फिर्यादी आणि त्यांच्या सासू सोडवण्यासाठी गेल्या असता, आरोपींनी त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालावरून आणि रेखा जोगी यांच्या तक्रारीवरून मूर्तीजापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-
आरोपींची नावे: १) श्रीकृष्ण गादे, २) सुनीता गादे, ३) राम श्रीकृष्ण गादे (सर्व रा. मजलापूर धामोरी, जि. अमरावती; ह.मु. हिरापूर).
-
दाखल कलमे: भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५, ३५१(२), ३५२ आणि ३[५] नुसार गुन्हा कायम करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) संजय खंडारे करत आहेत. दाखल अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप आठवले यांनी जबाबदारी पार पाडली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
