पिंपरी चिंचवडमध्ये शाहिरी आणि लोकगीतांचा कडकडाट! ‘माय मराठीची गौरवगाथा’ सोहळ्याने रसिक मंत्रमुग्ध; मराठी संस्कृतीचा दिमाखदार जागर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : खंजिरीचा कडकडाट, ढोलकीचा धडाका आणि शब्दाशब्दांतून ओसंडून वाहणारी मायमराठीची अस्मिता… अशा भारदस्त वातावरणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘माय मराठीची गौरवगाथा’ हा सांस्कृतिक सोहळा रंगला. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात लोककला, शाहिरी आणि सुश्राव्य संगीताचा सुरेल संगम रसिकांनी अनुभवला.
लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर (मुंबई) यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संदेश विठ्ठल उमप आणि शाहीर पृथ्वीराज माळी यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून मराठी संस्कृतीचे वैभव उलगडले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने होताच संपूर्ण प्रेक्षागृह महाराष्ट्रप्रेमाने भारावून गेले. त्यानंतर ‘जयोस्तुते’, ‘मी डोलकर’, ‘नेसते पैठणी चोळी’, ‘आम्ही ठाकरं’ आणि ‘लिंगोबाचा डोंगर’ अशा एकापेक्षा एक सरस गीतांनी लोकसंस्कृतीची सजीव झलक पेश केली. ‘जांभूळ आख्यान’ आणि ‘मनातून उसळे’ यांसारख्या ओजस्वी सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. शेवटी ‘ने मजसी ने’ या अजरामर गीताने सोहळ्याचा भावपूर्ण समारोप झाला.
शाहीर पृथ्वीराज माळी यांनी ‘पोवाडा महाराष्ट्राचा’, ‘माझ्या भीमराया’, ‘गोंधळाला या ग’ आणि ‘जोगवा’ या गीतांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अस्मितेचा सुंदर संगम घडवून आणला. ढोलकीवर राजू घोलप यांच्या ठेक्याने संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते. त्यांना शाहीर अभंगराज माळी आणि अवधूत पवार यांनी मोलाची साथ दिली.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून केवळ गाण्यांचाच नाही, तर शब्दांचाही उत्सव साजरा करण्यात आला. प्रेक्षागृह परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक मारुती भापकर, अरुण बोऱ्हाडे, शाहीर सम्राट देवानंद माळी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संतोष लिंबोरे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


