घरातील ‘भंगार’ ठरेल गरजूंचा आधार! पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘RRR’ उपक्रम; वापरात नसलेल्या वस्तू केंद्रात जमा करण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : घराची साफसफाई करताना अनेकदा जुनी खेळणी, कपडे, भांडी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण बाहेर फेकून देतो. यामुळे शहरात कचरा वाढतो आणि सौंदर्याला बाधा पोहोचते. मात्र, याच वस्तू योग्य पद्धतीने संकलित करून गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी आर.आर.आर. (Reduce, Reuse, Recycle) केंद्रे सुरू केली आहेत. स्वच्छ आणि हरित शहरासाठी नागरिकांनी आपल्या वापरात नसलेल्या पण चांगल्या स्थितीतील वस्तू या केंद्रात जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही केंद्रे कार्यान्वित केली आहेत.
नागरिक आर.आर.आर. केंद्रात खालील वस्तू देऊ शकतात:
-
शैक्षणिक: पुस्तके, वह्या, शालेय साहित्य आणि खेळणी.
-
कापड: चांगल्या स्थितीतील कपडे, चादरी आणि पडदे.
-
घरगुती: भांडी, फर्निचर आणि घरगुती साहित्य.
-
इलेक्ट्रॉनिक: छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला व इतर पुनर्वापरयोग्य वस्तू.
महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक भागात ही सोय उपलब्ध करून दिली आहे:
-
अ क्षेत्रीय कार्यालय: कापसे उद्यान (मोरवाडी), आकुर्डी भाजी मंडई, श्रीधरनगर गार्डन.
-
ब क्षेत्रीय कार्यालय: थेरगाव (SKF शेजारी), रावेत (धर्मराज चौक), काळेवाडी (ज्योतिबा उद्यान).
-
क क्षेत्रीय कार्यालय: अजमेरा क्रीडा संकुल, धावडे वस्ती (भोसरी), मोशी, पिंपळे गुरव.
-
ड क्षेत्रीय कार्यालय: कोकणे चौक (लिनियर गार्डन), पिंपळे निलख, वाकड (तानाजी कलाटे उद्यान).
-
इ क्षेत्रीय कार्यालय: मोशी चौक, दिघी जकात नाका, राजमाता जिजाऊ उड्डाण पूल (भोसरी).
-
फ क्षेत्रीय कार्यालय: चिखली (वृंदावन), चिखली (अटल बिहारी वाजपेयी उद्यान), रूपीनगर, सेक्टर २१.
-
ग क्षेत्रीय कार्यालय: थेरगाव (जगताप नगर), पिंपरीगाव बसस्टॉप, रहाटणी गावठाण.
-
ह क्षेत्रीय कार्यालय: संत तुकाराम नगर (गोल मंडई), सांगवी (सीतांगण गार्डन), जुनी सांगवी भाजी मंडई.
“स्वच्छ आणि हरित शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. या केंद्रांमुळे पर्यावरणासोबतच गरजू बांधवांना मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
“हा उपक्रम स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांना जोडणारा आहे. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे शहरात कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


