स्मार्ट सिटीचा कारभार आता ‘लाईव्ह’ होणार? सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करा; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची आयुक्तांकडे आक्रमक मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०४ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “आपले लोकप्रतिनिधी सभागृहात जनतेचे प्रश्न कशा प्रकारे मांडतात आणि करदात्या नागरिकांच्या पैशांचे नियोजन कसे केले जाते, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक शहरवासीयाला आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज ‘लाईव्ह’ (थेट प्रक्षेपित) करणे ही काळाची गरज आहे,” अशी आक्रमक मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी आज महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदन देऊन आगामी सभेपासूनच हे कामकाज डिजिटल माध्यमांवरून थेट प्रसारित करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड ही राज्यातील एक महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावलौकिक मिळवलेली महानगरपालिका आहे. शहराच्या विकासाचे सर्व मोठे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात, ती म्हणजे ‘सर्वसाधारण सभा’. मात्र, या सभेत नेमकी काय चर्चा होते, हे नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. जर मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या महानगरपालिका आपले कामकाज ‘लाईव्ह’ करू शकतात, तर तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये ही सुविधा का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत रस आहे. सभेचे कामकाज महानगरपालिकेच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित केल्यास:
-
नागरिकांना आपल्या प्रभागातील प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी केलेल्या चर्चेची माहिती मिळेल.
-
प्रशासकीय कामात पारदर्शकता येईल.
-
नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होईल.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण आधीच तंत्रज्ञानाचा मोठा वापर करत आहोत, त्यामुळे हे प्रक्षेपण करणे प्रशासनासाठी सहज शक्य आहे. जनहित आणि पारदर्शकता लक्षात घेता, आगामी सर्वसाधारण सभेपासूनच हे कामकाज लाईव्ह करण्याबाबत संबंधित विभागाला त्वरित आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेत्यांच्या या मागणीमुळे आता महापालिका प्रशासन ‘लाईव्ह’ प्रक्षेपणाबाबत काय सकारात्मक पाऊल उचलते, याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
