‘सुरक्षित काम, सुरक्षित जीवन’! चिंचवडमध्ये औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ; कामगारांनी घेतली अपघातमुक्त कार्यसंस्कृतीची शपथ
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०४ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड : “पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये लाखो कामगार काम करतात. मात्र, कारखान्यांमध्ये होणारे अपघात पाहता केवळ कंपन्यांच्या बाहेर सुरक्षा सप्ताहाचे फलक लावून उपयोग होणार नाही, तर कामगारांना सुरक्षिततेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि जनजागृतीची अधिक गरज आहे,” असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त (४ मार्च ते १० मार्च) कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने थरमॅक्स चौक, चिंचवड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेकडो कामगारांनी सुरक्षित काम करण्याची सामूहिक शपथ घेतली.
यावेळी ५५ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व सांगताना काशिनाथ नखाते म्हणाले की, कामगारांचे जीवन आणि त्यांचे अवयव अनमोल आहेत. कंत्राटी आणि असंघटित कामगारांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांबाबत कमालीची अनास्था दिसून येते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. कामगारांनी कामाच्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट, सेफ्टी शूज, हेल्मेट, ग्लोव्हज आणि मास्क यांचा वापर करणे अनिवार्य आहे.
कार्यक्रमात कामगारांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे आणि अग्निशमन यंत्रणा चालवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सुरक्षिततेसाठी खालील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या:
-
नादुरुस्त यंत्रावर काम करणे टाळावे.
-
यंत्रात बिघाड असल्यास त्वरित वरिष्ठांना कळवून दुरुस्ती होईपर्यंत कामास नकार द्यावा.
-
धोकादायक रसायनांपासून सुरक्षित अंतर राखावे.
-
कामाच्या ठिकाणी कोणतेही अडथळे न ठेवता स्वच्छता राखावी.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, लाला राठोड, सुनील भोसले, दिलीप डिकोळे, रोहन मुरगुंड, सामशुद्दीन शेख, विकास कुमार, किसन कदम, रंजना पाटील, शुभम कोरे, अनिल भोसले, वंदना राणे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन ‘अपघातमुक्त चिंचवड’ घडवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
