पुरस्कार हा कर्तृत्वाचा आणि मानवी मूल्यांचा गौरव! पिंपरी-चिंचवड सन्मान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०९ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “पुरस्कार हा केवळ एखाद्या व्यक्तीचा सन्मान नसून त्याने आयुष्यभर जपलेल्या मानवी मूल्यांचा, कष्टांचा आणि सामाजिक योगदानाचा तो सार्वजनिक गौरव असतो. पिंपरी-चिंचवड हे शहर आज केवळ उद्योगांचे केंद्र राहिले नसून ते वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झाले आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
‘न्यूज १४ लाइव्ह’चे मुख्य संपादक अविनाश कांबीकर यांच्या वतीने आयोजित ‘पिंपरी-चिंचवड सन्मान सोहळा २०२६’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या सोहळ्यात शहराचे नवनियुक्त महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेबजी भोईर, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजन लाखे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी व महापौरांचा डॉ. सबनीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
महापौर रवि लांडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पिंपरी-चिंचवड हे शहर कष्टकरी आणि प्रामाणिक नागरिकांच्या श्रमातून उभे राहिले आहे.” तसेच त्यांनी लवकरच प्रवासवर्णनावर आधारित पुस्तक लिहिणार असल्याचे सांगून त्याची प्रस्तावना डॉ. सबनीस यांनी लिहावी, अशी इच्छा व्यक्त केली. विरोधी पक्षनेते भाऊसाहेबजी भोईर यांनी शहराला कलेचे आणि संस्कृतीचे केंद्र बनवण्याचे स्वप्न बोलून दाखवले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील व्यक्तींना ‘पिंपरी-चिंचवड सन्मान’ प्रदान करण्यात आला:
-
कला व संगीत: अथर्व अभय कुलकर्णी
-
पर्यावरण संवर्धन: अरुण पुराणिक
-
साहित्य व शिक्षण: डॉ. राजेंद्र काकंरिया
-
उद्योजक व सामाजिक: अनिल मित्तल
-
कृषी क्षेत्र: संतोष खवळे
-
गिर्यारोहण: कृष्णा ढोकले
-
कुस्ती: श्लोक ताम्हाणे
-
लेखन व निवेदक: श्रीकांत चौगुले
-
शिक्षण: पांडुरंग वाघमारे
-
सांस्कृतिक व चित्रपट: प्रद्योत पेंढारकर
या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे अविनाश कांबीकर दिग्दर्शित ‘MPSC बॉईज’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर अनावरण. स्पर्धा परीक्षेसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुलतान’ या लघुपटाचे विशेष प्रदर्शनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तर तानाजी साठे यांनी आभार मानले. निपक्षपाती पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ‘न्यूज १४ लाइव्ह’ कटिबद्ध असल्याचे मुख्य संपादक अविनाश कांबीकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


