प्रलंबित मागण्यांसाठी गुरव समाजाचा एल्गार! १७ मार्चला मुंबईत ‘विराट धरणे मोर्चा’; आझाद मैदानावर घुमणार ‘चलो मुंबई’चा नारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १० मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : सकल गुरव समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी अखिल गुरव समाज संघटनेने आता थेट सत्तेच्या केंद्रस्थानी धडक देण्याचे ठरवले आहे. मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर गुरव समाजाचा भव्य धरणे मोर्चा आयोजित करण्यात आला असून, ‘चलो मुंबई’ या हाकेखाली संपूर्ण महाराष्ट्रातून समाजबांधव एकवटणार आहेत.
अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे यांनी या आंदोलनाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी नुकतीच जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात राज्यव्यापी बैठक पार पडली.
गुरव समाजाने शासनासमोर अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत, ज्यामध्ये वर्षानुवर्षे कोणताही ठोस निर्णय झालेला नाही:
-
इनाम जमिनींचा प्रश्न: देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनींवरील वतन खालसा करून मूळ सनदधारकांना ताबा मिळावा.
-
विश्वस्त पदांवर आरक्षण: राज्यातील सर्व मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाला ५० टक्के विश्वस्त पदे मिळावीत.
-
पूजेचा हक्क: पुजाऱ्यांचा वंशपरंपरागत पूजेचा हक्क अबाधित राहावा.
-
निवृत्ती वेतन: ६० वर्षांवरील पुजाऱ्यांना दरमहा ५००० रुपये मानधन आणि निवृत्ती वेतन लागू करावे.
-
आरक्षण आणि निधी: ओबीसी आरक्षणांतर्गत लोकसंख्येनुसार निधीत वाढ मिळावी.
हे आंदोलन संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे. या मोर्चाला राष्ट्रीय गुरव महासंघ, गुरव क्रांती मोर्चा, पिंपरी-चिंचवड गुरव समाज संस्था, तसेच पुणे, सातारा, नाशिक, संभाजीनगर यांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
“हा लढा आपल्या अस्तित्वाचा आणि हक्काचा आहे. शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने १७ मार्चला मुंबईत उपस्थित राहावे,” असे आवाहन शितल शिंदे यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


