घरेलू कामगारांच्या लढ्याला मोठे यश! केंद्र व राज्याच्या नवीन नियमांनुसार मिळणार लाभ; प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
पिंपरी/मुंबई चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, ११ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई/पिंपरी : काल आझाद मैदानावर हजारो घरेलू कामगारांनी दिलेल्या ‘एल्गार’ची दखल अखेर राज्य सरकारने घेतली आहे. महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन आणि कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळात आज झालेली चर्चा सकारात्मक ठरली असून, घरेलू कामगारांना नवीन नियमांनुसार सर्व लाभ देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
मुंबईत काल काढण्यात आलेल्या भव्य मोर्चानंतर आज पोलिसांनी या शिष्टमंडळाची प्रधान सचिवांसोबत बैठक घडवून आणली.
-
नवीन नियमावली लागू होणार: केंद्र आणि राज्य शासनाच्या बदललेल्या कामगार धोरणानुसार घरेलू कामगारांना मिळणारे लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार लवकरच विशेष प्रसिद्धी पत्रक (Circular) जाहीर करणार आहे.
-
सामाजिक सुरक्षा व विमा: घरेलू कामगारांना ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना) लागू करण्याबाबत आणि त्यांना सामाजिक सुरक्षा कवच देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
-
नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार: घरेलू कामगार मंडळातील नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी करण्यात येईल.
-
मंडळास निधी: कामगार मंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबाबतही प्रधान सचिवांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
“गेल्या अनेक दिवसांपासून घरेलू कामगार दुर्लक्षित होते. कालच्या मोर्चामुळे सरकारने दखल घेतली आहे. आता केवळ आश्वासन नको तर कृती हवी,” अशी भावना कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.
या चर्चेच्या वेळी निमंत्रक राजू वंजारे, ‘श्रमिक’चे संतोष विभुते, पुष्कराज शिरधनकर, संतोष थोरात, वंदना चिंचोळकर, शांता खोत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
