पुणे आता कोरियन गुंतवणुकीचे ‘हब’! ४० हून अधिक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सज्ज; पीसीयूमध्ये ‘कोरिया फॅसिलिटेशन सेंटर’ कार्यान्वित
पिंपरी/पुणे प्रतिनिधी आकाश कांबळे १८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन बिझनेस डेस्क:
पुणे/पिंपरी : महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे जिल्हा आता कोरियन उद्योजकांसाठी गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येत आहे. ऑटोमोबाईल आणि उत्पादन (Manufacturing) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यासाठी कोरियन उद्योजक सकारात्मक असून, तब्बल ४० हून अधिक कंपन्यांनी आगामी काळात एमआयडीसी क्षेत्रात जमीन खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली आहे.
पुणे येथील हॉटेल ऑर्चिड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), कोरिया एसएमइज अँड स्टार्टअप एजन्सी (KOSME) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ही माहिती देण्यात आली.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू (IAS) यांनी यावेळी मोठी घोषणा केली. कोरियन उद्योगांच्या समन्वयासाठी लवकरच ‘एक खिडकी’ (Single Window) योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने (PCET) स्थापन केलेले “पीसीयू – कोरिया फॅसिलिटेशन सेंटर” हे भारत आणि कोरिया यांच्यातील उद्योग, कौशल्य विकास आणि संशोधनाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
त्रैमासिक आढावा बैठक: एमआयडीसी अधिकारी, कोरियन वाणिज्य दूत आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात दर तीन महिन्यांनी मुंबईत समन्वय बैठक आयोजित केली जाईल.
-
कौशल्य विकास: पीसीयू केंद्रातर्फे कोरियन भाषा कार्यक्रम, इंटर्नशिप आणि संशोधन प्रकल्पांद्वारे स्थानिक तरुणांना जागतिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
-
कंपन्यांचा सहभाग: ह्युंदाई ग्लोविस, इलजिन ग्लोबल, ह्योसंग ग्रुप, सेन्सरटेक इंडिया यांसारख्या नामवंत कोरियन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी गुंतवणुकीचे प्रस्ताव मांडले.
यावेळी एमआयडीसीचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राठोड, कोरियाचे महावाणिज्य दूत (मुंबई) यू डोंग वॉन, कॉस्मे संचालक ली जे क्युंग, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे सचिन इटकर, डॉ. प्रणव चरखा आणि प्रा. युजिन हान उपस्थित होते.
“भारत-कोरिया सहकार्याला नवे बळ देण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. एमआयडीसी आणि कोरियन कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
— डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, PCET.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे आणि पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, यामुळे पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


