‘संभाजी महाराज पुतळा’ प्रकल्पात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; १४ कोटींच्या अपव्ययाप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकाचे काम अत्यंत पवित्र आणि पारदर्शक असायला हवे होते. मात्र, प्रशासकीय अनास्था आणि नियोजनाच्या अभावामुळे या प्रकल्पाच्या नावाखाली जनतेच्या कररूपी पैशांची उधळपट्टी होत आहे,” असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केला आहे.
या प्रकल्पातील टप्पा १ आणि २ मध्ये झालेल्या गंभीर अनियमिततांबाबत भोईर यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सविस्तर पत्र देऊन संबंधित अधिकारी आणि सल्लागारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
१. चुकीच्या नियोजनामुळे १४ कोटींचा चुराडा:
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ज्या जागेवर काम सुरू झाले होते, तिथे सुमारे १४ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सल्लागाराने जागेची नीट पडताळणी न केल्याने ही जागा नंतर बदलावी लागली. यामुळे आधी खर्च झालेले १४ कोटी रुपये पाण्यात गेले असून, याला जबाबदार असणाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२. पुतळा कामात ‘कमिशन एजंट’चा शिरकाव?
पुतळा उभारणीचे काम ‘मे. धनेश्वर’ कंपनीला देण्यात आले, ज्यांना या कामाचा कोणताही पूर्वअनुभव नाही. प्रत्यक्षात पुतळा जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी तयार केला आहे, मात्र बिले धनेश्वर कंपनीमार्फत काढली जात आहेत. ही प्रक्रिया म्हणजे स्पर्धात्मक निविदा पद्धतीची फसवणूक असून ‘CVC Guidelines’ चे उल्लंघन असल्याचे भोईर यांनी नमूद केले.
३. निविदा रकमेत ३५ टक्क्यांहून अधिक वाढ:
टप्पा २ च्या कामात मूळ १५ कोटींच्या निविदेत नंतर ५ कोटी ४१ लाखांची वाढ करण्यात आली. नियमानुसार ५ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्यास फेरनिविदा काढणे आवश्यक असताना, ३५.७९% वाढ मंजूर करणे बेकायदेशीर असल्याचे पत्रात म्हटले आहे.
४. स्थापत्य आणि विद्युत कामांची भेसळ:
या कामात ६०% काम विद्युत विषयक असताना त्याची स्वतंत्र निविदा न काढता ती स्थापत्य कामातच घुसडण्यात आली. यामुळे तज्ज्ञ कंपन्या स्पर्धेतून बाहेर राहिल्या आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले.
विरोधी पक्षनेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी केली आहे. तसेच:
-
अयोग्य जागेची शिफारस करणाऱ्या प्रकल्प सल्लागाराला (Consultant) काळ्या यादीत टाकावे.
-
जबाबदार अधिकारी आणि एजन्सीवर भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत.
-
निविदा नियमांचे उल्लंघन करून दिलेल्या कामांच्या देयकांना (Payments) तात्काळ स्थगिती द्यावी.
“महाराजांचे स्मारक हे नीतिमत्तेचे प्रतीक असायला हवे. जर या स्मारकाच्या पायालाच भ्रष्टाचाराची वाळवी लागली असेल, तर ते महाराजांच्या विचारांशी प्रतारणा ठरेल. जर १५ दिवसांत कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते, PCMC.
या निवेदनावर रेश्मा कातळे, पंकज भालेकर, सुलभा उबाळे, यश साने, विराज लांडे, उज्वाला ढोरे, वर्षा जगताप, दिप्ती कांबळे, निकिता कदम, प्रियांका कुदळे यांसह अनेक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
