स्वच्छतेचा ‘धडा’! पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अस्वच्छता आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांना दणका; २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , १८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नवनियुक्त आयुक्तांनी कंबर कसली असतानाच, महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १७ मध्ये सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक वापरणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करत एकाच दिवसात २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक असल्याने प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांवर ही टाच आणण्यात आली.
आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत एकूण ९ प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आला:
-
५ हजार रुपयांची ३ मोठी प्रकरणे.
-
२ हजार रुपयांचे १ प्रकरण.
-
१ हजार रुपयांची ४ प्रकरणे.
-
५०० रुपयांचे १ प्रकरण.
-
एकूण दंड: २१,५००/- रुपये.
ही कारवाई केवळ प्लास्टिक पुरती मर्यादित नसून, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि घाण करणाऱ्या नागरिकांवरही या मोहिमेअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य निरीक्षक रुपाली साळवे यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ही दंडात्मक कारवाई केली.
“वसुंधरेचे संरक्षण आणि शहराची स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेकडून यापुढेही कडक कारवाई केली जाईल.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिकेने नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्याचे आणि स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात ही मोहीम शहरातील इतर प्रभागांमध्येही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

