पासपोर्ट पडताळणी होणार आता अधिक वेगवान आणि पारदर्शक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात विशेष प्रशिक्षण सत्र संपन्न; ‘PSP २.०’ प्रणालीवर भर
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
चिंचवड : पासपोर्ट मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पोलीस पडताळणी (Police Verification) प्रक्रिया अधिक कार्यक्षम, अचूक आणि जलद करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एका विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे हे सत्र पार पडले.
यावेळी प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी (RPO Pune) डॉ. विनोद गायकवाड आणि पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) प्रदीप जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
-
तंत्रज्ञानाचा वापर: परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सेवा अधिक पारदर्शक करण्यासाठी सुरू केलेल्या नव्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. वेळेत होणारी पडताळणी ही केवळ नागरिकांच्या सोयीसाठीच नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही तितकीच महत्त्वाची असल्याचे डॉ. गायकवाड यांनी नमूद केले.
-
पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) २.०: उप पासपोर्ट अधिकारी सौ. श्रुती पांडे यांनी ‘PSP २.०’ या प्रगत प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. या नवीन डिजिटल प्रणालीमुळे पोलीस आणि पासपोर्ट विभाग यांच्यातील समन्वय वाढून पडताळणी प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि वेगवान झाली आहे.
-
अडचणींचे निराकरण: या सत्रात पोलीस ठाण्यांमधील पासपोर्ट अमंलदारांसाठी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. कागदपत्रांमधील त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि सामान्य शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आपला पासपोर्ट पडताळणी अहवाल (Police Verification Report) विहित वेळेत मिळण्यास मदत होईल. पोलीस आणि पासपोर्ट विभागातील समन्वय अधिक दृढ झाल्यामुळे प्रक्रियेत होणारी विनाकारण टाळाटाळ कमी होणार आहे.
या सत्राला विशेष शाखेचे अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे पासपोर्ट पडताळणी अमंलदार आणि विशेष शाखा-२ चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
