पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये मोठा भूकंप? सचिन काळभोर थेट ‘मातोश्री’वर; आमदार महेश लांडगेंशी सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद; मशाल हाती घेणार?
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन राजकीय विशेष:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात आज एका भेटीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आणि माजी चिटणीस सचिन काळभोर यांनी थेट मुंबई गाठत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. वरवर पाहता ही भेट एका खासगी कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी, यामागे मोठे राजकीय अर्थ दडले असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे आणि सचिन काळभोर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा हा परिणाम मानला जात आहे.
सचिन काळभोर आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय वाद गेल्या दोन महिन्यांपासून विकोपाला गेला आहे:
१. निवडणूक तिकिटाला विरोध: दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सचिन काळभोर यांनी भाजपच्या माध्यमातून उमेदवारी मागितली होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी काळभोर यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केल्याचे बोलले जाते, ज्यामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते.
२. स्वीकृत नगरसेवक पदावरून ठिणगी: सध्या महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. सचिन काळभोर यांनी भाजपच्या माध्यमातून आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार लांडगे यांनी काळभोर यांची नियुक्ती होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींकडे उघडपणे विरोध दर्शवला आहे.
भाजपमध्ये सातत्याने होणारी कोंडी आणि आमदारांकडून होणारा विरोध यामुळे संतापलेल्या सचिन काळभोर यांनी आता पर्यायी राजकीय वाटेचा विचार सुरू केल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या या चर्चेमुळे काळभोर लवकरच आपल्या समर्थकांसह शिवसेना (UBT) पक्षात जाहीर प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सचिन काळभोर हे भोसरी आणि चिखली परिसरात दांडगा जनसंपर्क असलेले कार्यकर्ते मानले जातात. जर त्यांनी भाजपला सोडचिठी दिली, तर भोसरी विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट आमदार महेश लांडगे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.
“मी केवळ एका खासगी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो,” असा दावा काळभोर यांच्याकडून केला जात असला तरी, राजकीय विश्लेषकांच्या मते “निमंत्रण हे केवळ निमित्त असून, मशाल हाती घेण्याची ही पूर्वतयारी आहे.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
