दापोडी ते मार्केट यार्ड आता थेट बससेवा! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठांची पायपीट थांबणार
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : दापोडी परिसरातील नागरिकांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण झाली असून, दापोडी ते मार्केट यार्ड या नवीन पीएमपीएमएल (PMPML) बससेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते दापोडी येथील मंत्री निकेतन बस स्टॉप (क्र. ११) येथून या बससेवेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
या नवीन बसमार्गामुळे दापोडी, फुगेवाडी परिसरातील विद्यार्थी, नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डपर्यंत थेट आणि परवडणारी प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे.
या उद्घाटन सोहळ्याला शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, नगरसदस्या स्वाती माई काटे, प्रतीक्षा लांघी-जवळकर, नगर सदस्य राजू बनसोडे, अप्पर डेपो मॅनेजर सुनील दिवाणजी, ट्रॅफिक मॅनेजर यशवंत हिंगे, समन्वयक गणेश कवठेकर तसेच बसचे चालक मनीष चितल्लू आणि वाहक योगेश जगताप यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दापोडी ते मार्केट यार्ड या मार्गावर थेट बस नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, जो खर्चिक ठरत असे. आता थेट बस सुरू झाल्यामुळे:
-
विद्यार्थी व महिला: सुरक्षित आणि स्वस्त प्रवास उपलब्ध झाला आहे.
-
ज्येष्ठ नागरिक: बाजारपेठेत जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे.
-
वाहतूक कोंडीवर उपाय: जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास शहरातील खासगी वाहनांची संख्या आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
“पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. दापोडी ते मार्केट यार्ड या नव्या बसमार्गामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यातही नागरिकांच्या मागणीनुसार अशा जनहितार्थ सुविधांना आम्ही प्राधान्य देऊ.”
महापौर रवि लांडगे
परिसरातील नागरिकांनी या बससेवेचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. ही सेवा सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


