news
Home पिंपरी चिंचवड पीसीएमसीत ‘पतीराज’चा हस्तक्षेप वाढला? जलतरण तलावाच्या निविदेवरून स्थायी समितीत हायव्होल्टेज ड्रामा

पीसीएमसीत ‘पतीराज’चा हस्तक्षेप वाढला? जलतरण तलावाच्या निविदेवरून स्थायी समितीत हायव्होल्टेज ड्रामा

यमुनानगर जलतरण तलावाच्या ठेक्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली! सुलभा उबाळे आणि अक्षय कारंडे यांच्यात जोरदार खडाजंगी; 'मर्जीतील' ठेकेदारासाठी लॉबिंगचे एकमेकांवर आरोप. स्थायी समिती सभेत निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात; सभापती अभिषेक बारणे यांनी विषय ठेवला तहकूब. | @२०२६ | मॅक्स मंथन विशेष प्रतिनिधी

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


पिंपरी पालिकेत ‘टेंडर’वरून रणकंदन! स्थायी समिती सभापतींच्या दालनात नगरसेविका आणि भाजप नेत्याच्या पतीमध्ये हमरीतुमरी; जलतरण तलावाचा विषय तहकूब


पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले, २७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष|:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा ‘टेंडर’च्या मुद्द्यावरून समोर आला आहे. यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाच्या ठेक्यावरून शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका सुलभा उबाळे आणि भाजप नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडे यांच्यात स्थायी समिती सभापतींच्या दालनात जोरदार खडाजंगी झाली. मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी झालेल्या या राड्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

यमुनानगर येथील जलतरण तलावाच्या कामासाठी निविदा (Tender) प्रक्रिया राबवण्यात आली होती. हा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आला असता, भाजप नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडे यांनी संबंधित ठेकेदारावर गंभीर आक्षेप घेतले. “या ठेकेदाराने सोलापूर येथे केलेल्या सदोष कामामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे ही निविदा रद्द करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

यावर नगरसेविका सुलभा उबाळे आक्रमक झाल्या. त्यांनी अक्षय कारंडे यांच्या बैठकीतील उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तुम्ही समितीचे सदस्य नसताना येथे काय करत आहात?” असा सवाल करत उबाळे यांनी सदर निविदा तातडीने मंजूर करण्याचा आग्रह धरला. यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वैयक्तिक टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

सुलभा उबाळे यांनी हा वाद चिघळल्यानंतर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याशी संपर्क साधून आपली बाजू मांडली. “अक्षय कारंडे यांना हे काम त्यांच्या मित्राला मिळवून द्यायचे आहे, म्हणून ते या निविदेला विरोध करत आहेत,” असा पलटवार उबाळे यांनी केला. दुसरीकडे, उबाळे स्वतः मर्जीतील ठेकेदारासाठी ‘लॉबिंग’ करत असल्याची चर्चा पालिका आवारात रंगली आहे.

या घटनेमुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत अधिकृत पद नसलेल्या व्यक्तींचा (नगरसेविकांचे पती) हस्तक्षेप किती वाढला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. “नगरसेविका सदस्य असताना त्यांचे पती बैठकीत येऊन निविदा प्रक्रियेवर प्रभाव कसा पाडू शकतात?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

उन्हाळा सुरू असल्याने जलतरण तलाव लवकर सुरू व्हावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या या अंतर्गत वादामुळे सभापती अभिषेक बारणे यांनी हा वादग्रस्त विषय तूर्तास तहकूब केला आहे. “सध्या हा विषय पुढील बैठकीपर्यंत थांबवण्यात आला असून, योग्य चौकशीनंतरच निर्णय घेतला जाईल,” असे सभापतींनी स्पष्ट केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!