मुर्तिजापूर नगर परिषदेचा ‘सुस्त’ कारभार! उपजिल्हा रुग्णालयाजवळील नाल्याची दुर्गंधी कायम; नगरसेवक गंपू शर्मा यांचा ‘कचराफेक’ आंदोलनाचा इशारा
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी: विलास सावळे, २७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष वृत्त:
मुर्तिजापूर : स्वच्छतेचे मोठमोठे दावे करणाऱ्या मुर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे. प्रभाग क्र. ९ मधील उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेला मुख्य नाला गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याने पूर्णतः ‘चोकअप’ झाला असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही. १५ जानेवारी २०२६ रोजी लेखी निवेदन देऊनही आरोग्य विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयापासून सुरू होऊन गोरक्षण संस्थानपर्यंत जाणारा हा विशाल नाला सध्या कचऱ्याचे आगर बनला आहे.
-
आरोग्याचा प्रश्न: नाल्यात साचलेल्या घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
-
नागरिकांचे हाल: या नाल्याच्या दोन्ही बाजूला दाट वस्ती असून लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
-
स्थानिक प्रतिक्रिया: “अनेक वर्षांपासून या नाल्याची नीट स्वच्छता झालेली नाही, आम्ही अक्षरशः नरकयातना भोगत आहोत,” अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
नगरसेवक गंपू शर्मा यांनी या प्रश्नी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही जानेवारी महिन्यात मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाशी प्रत्यक्ष चर्चा केली होती. मात्र, दोन महिने उलटूनही एकाही अधिकाऱ्याने फिरकून पाहिले नाही. अधिकारी केवळ टोलवाटोलवी करत आहेत. नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार सुस्त झाला असून जनतेच्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. या नाल्याजवळच त्रिमूर्ती बुद्ध विहार असून जयंती उत्सवासाठी येणाऱ्या अनुयायांना या दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
गंपू शर्मा यांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा:
“येत्या काही दिवसांत जर या नाल्याची पूर्ण स्वच्छता झाली नाही, तर त्रिमूर्ती नगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर नगर परिषद प्रशासकीय इमारतीमध्ये ‘कचरा फेको’ आंदोलन छेडले जाईल. यादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार असेल.”
एकीकडे शहरात विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणचा नाला साफ न होणे, हे प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे. आता मुख्याधिकारी यावर काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण मुर्तिजापूरकरांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
