पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ‘एलगार’! कुलसचिवांच्या नियुक्तीवरून रणकंदन; ६२ कोटींचा निधी आणि रखडलेल्या निकालांवरून प्रशासनाला घेरले
पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन शैक्षणिक विशेष:
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरात शुक्रवारी विद्यार्थी संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘जनआक्रोश’ आंदोलन छेडले. कुलसचिवांची वादग्रस्त नियुक्ती रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह, रखडलेले निकाल आणि निधीचा गैरवापर यावरून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. अर्थसंकल्पीय सिनेट बैठक सुरू असतानाच मुख्य इमारतीसमोर झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, स्टुडंट हेल्पिंग हँड्स, अभाविप, युवासेंना, छात्र भारती आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांसह अनेक पुरोगामी व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन केले. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
-
कुलसचिव नियुक्ती: गेल्या आठवड्यात झालेली कुलसचिवांची ‘वादग्रस्त’ नियुक्ती तात्काळ रद्द करावी.
-
रुसा (RUSA) निधी: राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत मिळालेला ६२ कोटी रुपयांचा निधी न वापरल्याचा आरोप करत, कुलगुरूंनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी.
-
निकालांचा खोळंबा: सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल तात्काळ जाहीर करावेत.
-
कमवा व शिका योजना: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करावी.
-
प्लेसमेंट सेल: विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी प्लेसमेंट सेल अधिक सक्षम करावा.
-
इतर सुविधा: कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही बसवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा वाढवणे आणि हॉस्टेलमधील एलपीजी (LPG) तुटवड्यामुळे निर्माण झालेला जेवणाचा प्रश्न सोडवणे.
विद्यार्थी नेते अभिषेक शेलकर म्हणाले, “महागाई वाढत असताना विद्यार्थ्यांचे मानधन वाढवणे गरजेचे आहे. जर मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर आंदोलन अधिक तीव्र करू.” तर कुलदीप आंबेकर यांनी इशारा दिला की, “कुलसचिवांची नियुक्ती रद्द न झाल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढू.” राहुल ससाणे यांनीही प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
आंदोलनाची तीव्रता पाहून कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. पराग काळकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले असून, सर्व मुद्द्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र, ठोस निर्णय मिळेपर्यंत विद्यार्थी संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
