news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! बिल्डरांची ‘हमीपत्रे’ आता महापालिकेच्या संकेतस्थळावर होणार प्रसिद्ध

पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! बिल्डरांची ‘हमीपत्रे’ आता महापालिकेच्या संकेतस्थळावर होणार प्रसिद्ध

फ्लॅटधारकांवर पाण्याचा आर्थिक भार टाकणाऱ्या बिल्डरांवर उगारला कायदेशीर बडगा! विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; भामा-आसखेड योजना पूर्ण होईपर्यंत विकसकांवरच पाणीपुरवठ्याची जबाबदारी. हमीपत्रांचे उल्लंघन केल्यास महापालिका करणार कडक कारवाई. | @२०२६ | मॅक्स मंथन विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

हमीपत्र दिलेल्या विकसकांनी सोसायट्यांना पाणी न दिल्यास कठोर कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ३मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ज्या विकसकांनी (डेव्हलपर्स) फ्लॅटधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारून लेखी हमीपत्र दिले आहे, त्यांनी ती जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे बंधनकारक आहे. या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास किंवा पाण्याचा आर्थिक भार सोसायट्यांवर टाकल्यास, महानगरपालिका संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करेल,” असा स्पष्ट इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या अनुषंगाने, पाणीपुरवठ्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आयुक्त बोलत होते.

या बैठकीत पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. भामा-आसखेड आणि आंद्रा पाणीपुरवठा योजनांचे काम अद्याप पूर्णतः संपलेले नाही, त्यामुळे सर्वच क्षेत्रांना १०० टक्के पाणीपुरवठा करणे सध्या शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी निर्देश दिले की, “ज्या ठिकाणी विकसकांनी स्वतःच्या खर्चाने पाणी देण्याचे हमीपत्र दिले आहे, तिथे त्यांनीच पाण्याचा खर्च उचलला पाहिजे. हा खर्च सोसायट्यांवर ढकलणाऱ्या विकसकांवर महापालिकांनी कायदेशीर बडगा उचलावा.”

नागरिकांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:

  • विकसकांनी सादर केलेली सर्व हमीपत्रे आणि मंजूर नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत.

  • आपली सोसायटी नेमकी कोणत्या पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट आहे, याची माहिती नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाईल.

“पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत अडचणी आल्यास नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार नोंदवावी. भामा-आसखेड योजना पूर्णतः कार्यान्वित होईपर्यंत संबंधित विकसकांवरच पाणीपुरवठ्याची जबाबदारी राहणार आहे. नागरिकांच्या हितसंरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरिदे यांच्यासह पुणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!