news
Home अकोला डिजिटल पोलीसिंगमध्ये अकोला राज्याच्या नकाशावर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्चित चांडक सन्मानित

डिजिटल पोलीसिंगमध्ये अकोला राज्याच्या नकाशावर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्चित चांडक सन्मानित

'१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' मोहिमेत अकोला पोलिसांची मोठी भरारी! पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना "सर्वोत्तम पोलीस अधीक्षक" पुरस्कार प्रदान; ; डिजिटल सेवांच्या अंमलबजावणीत अकोला पोलीस सरस. | @ २०२६ | मॅक्स मंथन विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अकोला पोलीस दलाचा राज्याच्या ई-गव्हर्नन्समध्ये डंका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्चित चांडक यांचा गौरव

 

 

 

अकोला / मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ३० मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला/मुंबई: महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ विशेष मोहिमेत अकोला पोलीस दलाने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मोहिमेत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांचा “सर्वोत्तम पोलीस अधीक्षक” म्हणून गौरव करण्यात आला.

राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये सहभागी कार्यालयांचे खालील सात मुख्य घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले:

१. अद्ययावत संकेतस्थळ (Website)

२. ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी

३. ई-ऑफिस (e-Office) चा १००% वापर

४. कार्यालयाचा डॅशबोर्ड (Dashboard)

५. व्हॉट्सअॅप चॅटबॉट (WhatsApp Chatbot) सुविधा

६. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

७. भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा वापर

राज्यातील एकूण ३४ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांची दोन टप्प्यांत कसून तपासणी आणि मूल्यमापन करण्यात आले. या अटीतटीच्या स्पर्धेत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय सातही निकषांवर सरस ठरत राज्यात तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री. अर्चित चांडक यांना प्रशस्तिपत्र प्रदान करून यथोचित सन्मानित करण्यात आले.

अकोला पोलिसांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता तर वाढणारच आहे, पण त्यासोबतच नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

या यशामध्ये तांत्रिक मदत करणारे श्री किशन पनपालीया, पोउपनि पठाण, पोहवा. गोपाल मूकंदे, आशिष आमले तसेच सर्व अधिकारी व अंमलदार यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी हा पुरस्कार अकोल्याचे नागरिक, मीडिया आणि संपूर्ण अकोला पोलीस दलाला समर्पित केला आहे.

अकोला पोलिसांच्या या डिजिटल भरारीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!