news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेची कर वसुलीत मोठी भरारी! थकबाकीदारांवर जप्तीची टांगती तलवार

पिंपरी-चिंचवड महापालिकेची कर वसुलीत मोठी भरारी! थकबाकीदारांवर जप्तीची टांगती तलवार

ऐतिहासिक कामगिरी! ५.८६ लाख मालमत्ताधारकांनी भरला कर; वाकड विभागाने ११० कोटींच्या वसुलीसह मारली बाजी; अभय योजनेअंतर्गत दंडावर ९० टक्के सवलत मिळवण्याची उद्या अंतिम संधी. | ३० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अभय योजनेला पिंपरी-चिंचवडकरांचा उदंड प्रतिसाद; मालमत्ता कर वसुलीचा ९०० कोटींचा टप्पा पार

 

 

प्रतीनिधी: पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ३० मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. १ एप्रिल २०२५ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत महापालिकेने तब्बल ९०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

शहरातील सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांपैकी ५ लाख ८६ हजार ८७६ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या नागरिकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले आहेत.

थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने १ मार्च २०२६ पासून ‘अभय योजना’ राबवली आहे. या योजनेअंतर्गत ३१ मार्चपर्यंत थकीत कर एकरकमी भरल्यास विलंब दंडावर ९० टक्के सवलत दिली जात आहे. उद्या (३१ मार्च) या योजनेचा शेवटचा दिवस असून, थकबाकीदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांपैकी वाकड कार्यालयाने सर्वाधिक वसुली नोंदवली आहे. विविध विभागांची वसुली आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • वाकड: ११० कोटी ४२ लाख रुपये

  • थेरगाव: ९२ कोटी ४८ लाख रुपये

  • चिखली: ७९ कोटी ५६ लाख रुपये

  • किवळे: ६२ कोटी ५८ लाख रुपये

  • भोसरी: ६० कोटी ३० लाख रुपये

    (इतर विभागांनीही कोट्यवधींची वसुली पूर्ण केली आहे.)

ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांच्या विरोधात कर संकलन विभागाने कडक पावले उचलली आहेत. बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, तर निवासी मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीमही राबविली जात असल्याची माहिती विभागातून देण्यात आली.

कोट:

“नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी दिलेला प्रतिसाद शहराच्या विकासात थेट योगदान देणारा आहे. अभय योजनेअंतर्गत दंडावर मोठी सवलत मिळत आहे, तरी उर्वरित थकबाकीदारांनी ही संधी साधून आपला कर तात्काळ भरावा.”

रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड.

कोट:

“मालमत्ता कर वसुली अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सोयी उपलब्ध केल्या आहेत. नागरिकांनी वेळेत कर भरून शहराच्या सर्वांगीण विकासात सहकार्य करावे.”

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!