दापोडी व गवळी माथा ‘शून्य कचरा’ प्रकल्पाची यशस्वी वाटचाल; शहरातील इतर झोपडपट्ट्यांमध्येही राबविणार उपक्रम
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: १ एप्रिल २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दापोडी आणि गवळी माथा परिसरात राबविण्यात येत असलेला ‘शून्य कचरा’ (Zero Waste) प्रकल्प शहरासाठी एक आदर्श मॉडेल ठरत आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या धर्तीवर शहरातील इतर झोपडपट्टी भागांमध्येही शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
महानगरपालिकेने सीवायडीए संस्था आणि अकर सोल्युशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.
-
दापोडी (आनंदवन व काटेवस्ती): येथे वैष्णवी महिला बचत गटामार्फत दररोज ४२८ घरांमधील कचऱ्याचे संकलन केले जाते.
-
गवळी माथा: येथे श्रीकृष्ण महिला बचत गटाद्वारे हा प्रकल्प चालविला जात आहे.
संकलित कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर आधुनिक यंत्रसामग्रीच्या (ॲग्लोमीटर, हायड्रॉलिक प्रेस, सेमी-ऑटोमॅटिक खतनिर्मिती यंत्र) सहाय्याने प्रक्रिया केली जाते. यातून दर्जेदार सेंद्रिय खत तयार केले जात असून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात आहे.
पाहणी दरम्यान आयुक्तांनी प्रकल्पात कार्यरत असलेल्या बचत गटातील महिलांशी संवाद साधला. “महिलांच्या पुढाकारामुळे हा प्रकल्प पर्यावरणपूरक आणि शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. कचरा प्रक्रियेत काम करणाऱ्या या महिलांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची महापालिका विशेष काळजी घेत आहे,” असे डॉ. सूर्यवंशी यांनी नमूद केले.
दापोडी व गवळी माथा येथील यशानंतर, शहरातील इतर दाट वस्तीच्या आणि झोपडपट्टी भागांतही असेच प्रकल्प राबवण्याचा आराखडा तयार करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे. यामुळे कचरा डेपोवरील भार कमी होऊन शहर अधिक स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे.
या पाहणी दौऱ्यात आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे, सहा. आयुक्त अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, सीवायडीए संस्थेचे कार्यकारी संचालक प्रविण जाधव, प्रकल्प व्यवस्थापक आशिष इंगोले यांच्यासह महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

