news
Home पिंपरी चिंचवड आळंदी हादरले! चिमुकली आणि वृद्धेच्या खुनाचा छडा; गुन्हे शाखा युनिट-३ ची धडक कारवाई

आळंदी हादरले! चिमुकली आणि वृद्धेच्या खुनाचा छडा; गुन्हे शाखा युनिट-३ ची धडक कारवाई

कौटुंबिक कलहातून निर्घृण हत्या; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने आरोपीला आळेफाट्यातून ठोकल्या बेड्या | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आळंदीतील दुहेरी हत्याकांड: ६ वर्षांच्या बालिकेसह वृद्धेचा खून करणाऱ्या नराधमास २४ तासांत अटक

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ३ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

आळंदी: आळंदी येथील हनुमानवाडी, ठाकरवस्ती भागात गुरुवारी (२ एप्रिल) सकाळी उघडकीस आलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेला यश आले आहे. अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला आळेफाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. कौटुंबिक कलहातून हा निर्घृण खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

फिर्यादी संगीता दत्तात्रय केदारी या इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या पाळीत साफसफाईचे काम करतात. त्यांची ६ वर्षांची नात धनश्री सोनू केदारी हिची देखभाल शेजारी राहणाऱ्या मंगल चंद्रकांत शिंदे (वय ७०) या करायच्या. १ एप्रिलच्या रात्री फिर्यादी कामावर गेल्या असताना घरात त्यांची नात आणि मंगल शिंदे या दोघीच होत्या. सकाळी ८:३० च्या सुमारास संगीता केदारी घरी परतल्या तेव्हा त्यांना नात आणि मंगल शिंदे या दोघी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. अज्ञात इसमाने कोणत्या तरी हत्याराने डोक्यावर मारहाण करून त्यांची हत्या केली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान फिर्यादीने विनायक तुकाराम भवारी (वय ३१) याच्यावर संशय व्यक्त केला होता. गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपी विनायक भवारी हा पुणे-नाशिक रोडवरील आळेफाटा येथील ‘हॉटेल समाधान’ जवळ असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने कौटुंबिक वादातून हे हत्याकांड केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे आणि पोलीस अंमलदार सोनवणे, बोहाडे, भोसुरे, सूर्यवंशी, भांगले, राळे, दांगट, महाले, थोरातवराडे यांचा समावेश होता. तांत्रिक विश्लेषणासाठी प्रकाश नानांवरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

पुढील तपास आळंदी पोलीस ठाणे करत आहे. एका निष्पाप बालिकेसह वृद्धेची हत्या करणाऱ्या आरोपीला तातडीने जेरबंद केल्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!