“लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद” – महापौर रवि लांडगे; निगडीत भव्य ‘ऑक्सिजन पार्क’चे उद्घाटन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ३ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी/निगडी: “लोकसहभागातून उभे राहणारे उपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद आहे. निगडी परिसरातील नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला ‘ऑक्सिजन पार्क’ हा पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श प्रकल्प आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
निगडी प्राधिकरण, सेक्टर २६ येथे स्थानिक रहिवासी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन महापौर लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अशा हरित प्रकल्पांमुळे शहर अधिक आरोग्यदायी आणि सुंदर बनेल. महानगरपालिकेच्या २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये लोकसहभागाची हीच संकल्पना राबवून शहर प्रदूषणमुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य अमित गावडे यांच्यासह मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, दिलीप भोसले, जयकुमार गुजर, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन वसुंधरेला स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याचा निर्धार केला. शपथेचे वाचन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
“शहरातील प्रत्येक प्रभागात हरित क्षेत्र वाढावे, यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत आहेत. लोकसहभागातून साकारलेले ऑक्सिजन पार्क हे भावी पिढ्यांसाठी मौल्यवान ठेवा आहे.”
— शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
“वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे जतन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



