अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर डंका! ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ला देशातील ‘Best IT Project’ ट्रॉफीने सन्मानित
अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ५ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला/नागपूर: अकोला पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपूर येथे आयोजित ६९ व्या ‘अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट’ (AIPDM) २०२५-२६ मध्ये अकोला पोलिसांच्या ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ या उपक्रमाला देशपातळीवर सर्वोत्कृष्ट आयटी प्रोजेक्ट म्हणून गौरवण्यात आले आहे.
शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथे पार पडलेल्या दिमाखदार समारंभात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते अकोला पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांना ‘NCB Running Trophy’ देऊन सन्मानित करण्यात आले.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB), नवी दिल्ली यांच्याकडे महाराष्ट्र पोलिसांकडून एकूण ५ आयटी प्रोजेक्ट्स पाठवण्यात आले होते. या सर्वांमधून ‘बेस्ट आयटी प्रोजेक्ट’ स्पर्धेसाठी ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ची निवड करण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली येथील एनसीआरबी मुख्यालयात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण केले होते. त्यांच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन देशपातळीवर या प्रकल्पाची निवड करण्यात आली.
‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ हा आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे प्रतिबंध करणे, गुन्हेगारांची ओळख पटवणे आणि पोलीस कार्यक्षमता वाढवण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. अकोला येथील युवा उद्योजक किसन पनपालिया यांनी या प्रकल्पासाठी मोलाचे तांत्रिक योगदान दिले आहे. गेल्या ६ महिन्यांच्या आकडेवारीनुसार, या प्रकल्पामुळे सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारीत ४८ टक्क्यांनी घट झाली आहे.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते, सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक श्री. सुनील रामानंद यांच्यासह देशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या यशामुळे अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या यशाचे श्रेय प्रकल्पात सहभागी असलेले सर्व अधिकारी, अंमलदार आणि तांत्रिक टीमला दिले असून सर्वांचे आभार मानले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पोलीस सेवेत पारदर्शकता आणि गतिमानता आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


