अकोल्यात प्रशासनाची मोठी कारवाई; एकाच दिवशी होणारे ५ बालविवाह रोखण्यात यश
अकोला प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ८ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज :
अकोला: जिल्ह्यात बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेविरोधात प्रशासनाने मोठी मोहीम उघडली असून, एकाच दिवशी होणारे पाच बालविवाह रोखून पाच बालकांचे भविष्य अंधकारात जाण्यापासून वाचवले आहे. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील एकाच कुटुंबातील दोन बहिणी व दोन भाऊ, तसेच अकोला तालुक्यातील एका बालिकेचा समावेश आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
‘ॲसेस टू जस्टीस’ (आय.एस.डब्ल्यू.एस.) या संस्थेला गोपनीय माहिती मिळाली की, बार्शीटाकळी आणि अकोला तालुक्यात एकाच वेळी पाच बालविवाह पार पडणार आहेत. माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील सरकटे, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये आणि ‘ॲसेस टू जस्टीस’चे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले.
तिथे लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, ४०० हून अधिक वऱ्हाडी जमले होते आणि बँड पथकही सज्ज होते. विधी सुरू होणारच होते, तेवढ्यात पथकाने कारवाई करून हा सोहळा थांबवला.
तपासादरम्यान एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. या पाचही बालकांपैकी दोन मुली कधीच शाळेत गेल्या नव्हत्या. तर उर्वरित तीन बालकांनी अर्धवट शाळा सोडली असून त्यांना आपल्या शाळेचे नावही सांगता आले नाही. ही मुले फक्त कागदोपत्री पटावर हजर होती, मात्र पालकांसोबत स्थलांतरित असल्याने शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिली होती.
या विवाहातील मुलींचे वय १६ आणि १७ वर्षे, तर मुलांचे वय १८ आणि १९ वर्षे असल्याचे निष्पन्न झाले.
-
समुपदेशन: पथकाने पालकांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची माहिती दिली आणि अल्पवयातील लग्नामुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम समजावून सांगितले.
-
हमीपत्र: बाल कल्याण समितीसमोर पालकांना हजर करण्यात आले. “मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न लावणार नाही,” असे कायदेशीर हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले.
बालविवाह घडवून आणणाऱ्या किंवा त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती चाईल्ड लाईन १०९८, पोलीस मदत ११२ किंवा बचपन बचाव आंदोलन १८००१०२७२२२ या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, ॲड. शिला तोषनिवाल, प्रांजली जयस्वाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने पार पाडली. या तत्परतेमुळे पाच बालकांचे भवितव्य सुरक्षित झाले असून सर्वस्तरातून या पथकाचे कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

