पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराचा ‘बॉस’ कोण? लेखा अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर स्थायी समिती अध्यक्षांचे गंभीर आरोप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या ‘बॉस’ संस्कृतीवरून मोठे राजकीय युद्ध पेटले असून, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन यांनी नियमांचे उल्लंघन करून आणि राजकीय दबावापोटी आर्थिक व्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केला आहे. या प्रकरणावरून महापालिकेत नेमका ‘बॉस’ कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या बजेट सभेमध्ये अनेक उपसूचना सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, या उपसूचनांचा कोणताही अधिकृत लेखाजोखा प्रवीण जैन यांच्याकडे आलेला नसतानाही, त्यांनी घाईघाईने बिले काढल्याचा संशय व्यक्त होत आहे. काही ‘बॉस’ म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरून आणि नवख्या नगरसेवकांचा वापर करून ही बिले लाटण्याचा प्रकार घडला आहे का? हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे.
शहरात महापौर रवि लांडगे यांनी कामाचा धडाका लावला असून, त्यांची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, ही वाढती लोकप्रियता आणि स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांचा प्रशासकीय अनुभव पाहून, भविष्यात आपल्या राजकीय खुर्चीला धोका निर्माण होऊ नये म्हणून काही ज्येष्ठ नगरसेवकांनी ही ‘फिल्डिंग’ लावली असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. काम करणाऱ्या व्यक्तीला पक्षाचा विचार न करता रोखण्याचा हा प्रकार शहराच्या विकासाला बाधक ठरत असल्याची टीका होत आहे.
स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी या प्रकरणाबाबत कायदेशीर सल्लागार राजेश आगळे यांच्याकडे पत्राद्वारे खुलासा मागितला होता. त्यावर आगळे यांनी स्पष्ट केले की, “महापौर, आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने मंजूर झालेल्या ठरावाशिवाय किंवा उपसूचनेशिवाय कोणतेही बिल काढण्याचा अधिकार लेखा अधिकाऱ्यांना नाही.” यामुळे प्रवीण जैन यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे आर्थिक व्यवहार केले, यावर संशयाची सुई अधिक गडद झाली आहे.
नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कार्यकाळ पारदर्शक मानला जातो. मात्र, काही ज्येष्ठ नेते अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘आम्हीच शहराचे कारभारी’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत सरावलेल्या काही अधिकाऱ्यांनी अद्यापही लोकनियुक्त सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू ठेवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
या भ्रष्टाचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही ठरावावर किंवा उपसूचनेवर सही करताना कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वाक्षरी करू नये, असा सूचक संदेश महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी नवीन नगरसेवकांना दिला आहे.
एकूणच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील हा ‘बॉस’ आणि अधिकाऱ्यांचे साटंलोटं उघड करण्यासाठी आता चौकशीची मागणी जोर धरत आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी काय कठोर पावले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

