पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानास्पद! महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाचे अंतराळ संशोधनात मोठे यश; महापौरांकडून डॉ. केतन रिकामे यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी भांडारपाल भास्कर रिकामे यांचे चिरंजीव डॉ. केतन भास्कर रिकामे यांनी खगोलभौतिकशास्त्र (Astrophysics) विषयात पी.एच.डी. पदवी प्राप्त करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अभिषेक फुगे, अतुल आचार्य, हनुमंत लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
निगडी येथील रहिवासी असलेले डॉ. केतन रिकामे सध्या ‘रमन रिसर्च इन्स्टिट्यूट’ (बंगलोर) येथे ब्लॅक होल आणि अवकाशातील क्ष-किरणांच्या अभ्यासासाठी संशोधन करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी विकसित केलेले ‘एक्स-रे पोलारिमीटर’ हे उपकरण जानेवारी २०२४ मध्ये इस्रोच्या (ISRO) XPoSat उपग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून प्रक्षेपित झालेल्या या उपग्रहाद्वारे सध्या अवकाशातील गूढ ब्लॅक होलचा सखोल अभ्यास केला जात आहे. या उपकरणाची निर्मिती आणि चाचणी प्रक्रियेत डॉ. केतन यांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. केतन यांनी आपले उच्च शिक्षण आयसर (IISER), पुणे येथून पूर्ण केले असून, त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Caltech) सारख्या जागतिक संस्थांमध्येही संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते डॉ. बिश्वजित पॉल व डॉ. व्ही. जितेश यांच्या मार्गदर्शनाखाली अंतराळ संशोधनात सक्रिय आहेत.
डॉ. केतन यांच्या यशामागे त्यांचे वडील भास्कर रिकामे यांची मोठी प्रेरणा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भांडारपाल म्हणून सेवा बजावताना त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे आणि शिक्षणाच्या भक्कम पायाभरणीमुळेच केतन यांनी आज जागतिक स्तरावर यश संपादन केले आहे. एका सामान्य महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाने अंतराळ संशोधनासारख्या कठीण विषयात मिळवलेल्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

