भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांचा उद्रेक; मुख्यमंत्र्यांना ‘घंटा’ भेट देऊन फोडणार वाचा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या, आंदोलने अंगावर घेणाऱ्या आणि गुन्हे दाखल झालेल्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप करत, भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा’ भेट देण्याचा इशारा दिला आहे.
सचिन काळभोर यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची संघटना वाढवण्यासाठी अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी मोर्चे आणि आंदोलने केली, ज्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झाले. मात्र, निवडणुकीत तिकीट देताना आणि आता स्वीकृत नगरसेवक पदाची नियुक्ती करताना या निष्ठावंतांना पूर्णपणे विसरले गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
शहरातील भाजपचे दिग्गज नेते, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे हे जुन्या कार्यकर्त्यांना विसरले आहेत, असा गंभीर आरोप काळभोर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट आणि शरद पवार गट) मधून आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना किंवा मंत्री, आमदारांच्या जवळच्या व्यक्तींनाच स्वीकृत पदी संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी सचिन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईत मंत्रालय आणि ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांना प्रतीक म्हणून ‘घंटा’ भेट दिली जाणार आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे.
-
फौजदारी गुन्हे अंगावर घेणाऱ्यांना न्याय द्या: आंदोलनांमुळे ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, त्यांना सत्तेत वाटा मिळावा.
-
प्रभाग १३ चा दाखला: २०१७ मध्ये आणि त्यानंतरही प्रभाग १३ मध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांना स्वीकृत पदी संधी मिळावी.
-
आयात नेत्यांना रोखा: इतर पक्षातून आलेल्या नवीन चेहऱ्यांऐवजी मूळ भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य द्या.
“आम्ही पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, आता आमची दखल घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून जुन्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्त करावे,” अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

