प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या ६ वर्षीय मुलाची आईनेच केली निर्घृण हत्या; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून आरोपी मातेस अटक
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी मनोज प्रधान , १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चाकण/महाळुंगे: अनैतिक प्रेमसंबंधात स्वतःचा ६ वर्षांचा मुलगा अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून, जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने मुलाची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना कुरुळी (ता. खेड) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिचा प्रियकर सध्या फरार आहे.
बसरिन मेहबुब शेख (वय २७, रा. मूळ रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. या घटनेत आवेज शेख (वय ६) या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विवाहित असलेल्या बसरिन शेख हिचे तिचे शेजारी राहणारे राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. मागील एक वर्षापासून ती आपल्या तीन मुलांपैकी आवेजला सोबत घेऊन प्रियकर रामसोबत कुरुळी येथे राहण्यास आली होती. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधात आवेज अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला.
दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास दोघांनी संगनमत करून आवेजचे डोके बाथरुममधील पाण्याचे बादलीत बुडवले आणि त्याचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. यानंतर हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी आणि याला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी आवेजचा मृत्यू ‘हृदयविकाराच्या झटक्याने’ झाल्याचा बनाव रचला.
आरोपींनी आवेजचा मृतदेह राम कजेवाड याच्या इर्टिगा कारमधून धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेला. मात्र, मुलाच्या डोक्यावर आणि पाठीवर जखमा दिसल्याने फिर्यादी इसाक शेख यांना संशय आला. त्यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवाल आणि बसरिनच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली असता, तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१), २३८, ६१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी राम कजेवाड याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


