पिंपरी गाव १२ तासांपासून अंधारात; कडाक्याच्या उन्हात नागरिकांचे हाल, जबाबदार अधिकाऱ्याचा फोन ‘नॉट रीचेबल’
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यात पिंपरी गाव परिसरातील नागरिकांना महावितरणच्या गलथान कारभारामुळे ‘शॉक’ बसला आहे. पिंपरी गावातील माऊली चहा समोरील परिसर काल रात्री १० वाजेपासून पूर्णपणे अंधारात असून, १२ तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर प्रचंड रोष व्यक्त केला आहे.
या गंभीर परिस्थितीला खराळवाडी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. भुजंगराव बाबर हे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. ज्यावेळी नागरिक अंधारात होते आणि त्यांना मदतीची गरज होती, तेव्हा बाबर साहेबांनी चक्क आपला फोन बंद करून ठेवला. “ज्या अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे, त्यांनीच जर कर्तव्य टाळून फोन बंद ठेवला, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे मुख्य जबाबदार अधिकारी गायब असताना, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मुंडे यांनी मात्र रात्री-अपरात्री नागरिकांचे फोन उचलून त्यांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच सहाय्यक अभियंता श्री. पालके यांनी कर्तव्यदक्षता दाखवत आज पहाटे ५ वाजता स्वतः घटनास्थळावर (स्पॉट) हजेरी लावली. सध्या त्यांच्या देखरेखीखाली केबल जॉईंट मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालके साहेब आणि रात्रभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला नागरिकांनी सलाम केला असला, तरी १२ तास उलटूनही वीज न आल्याने संताप कायम आहे.
उन्हाळ्याच्या रात्री लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना वीज नसल्यामुळे प्रचंड हाल सोसावे लागले. केबल खराब होण्यामागे संबंधित ठेकेदार किंवा देखरेखीचा अभाव कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ज्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेकडो नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली, त्यांच्यावर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
“अधिकारी जेव्हा स्वतःचा फोन बंद करून पळ काढतात, तेव्हा जनतेचा संयम सुटतो. आम्ही कामाचा सतत मागोवा घेत आहोत. ज्यांच्यामुळे हा मनस्ताप सहन करावा लागला, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
— सुहास कुदळे, सामाजिक कार्यकर्ते
महावितरणचे कर्मचारी अजूनही कामात व्यस्त आहेत, मात्र वीज कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे महावितरणची प्रतिमा डागाळत असून वरिष्ठ प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



