खरीप पीक विम्यासाठी मुर्तिजापुरात एल्गार! महाराष्ट्र दिनी महामार्गावर ठिय्या आंदोलनाचा इशारा
अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, मॅक्स मंथन डेली न्यूज, १३ एप्रिल २०२६
मुर्तिजापूर: तालुक्यातील सर्व विमाधारक आणि विमा न भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा, या मागणीसाठी ‘प्रगती शेतकरी मंडळ’ आक्रमक झाले आहे. येत्या २५ एप्रिलपर्यंत विम्याची रक्कम खात्यात जमा न झाल्यास, १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या संदर्भात प्रगती शेतकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष राजू साहेबराव वानखडे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना १३ एप्रिल रोजी निवेदन दिले.
-
सरसकट विमा वितरण: तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना, ज्यांनी विमा भरला आहे आणि जे तांत्रिक कारणास्तव विमा भरू शकले नाहीत, अशा सर्वांना सरसकट विमा देण्यात यावा.
-
विमा जमा करण्याची मुदत: विमा कंपनीने २५ एप्रिल २०२६ पर्यंत खरीप २०२५ चा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.
-
हेक्टरी १७,५०० रुपयांची अंमलबजावणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हेक्टरी १७,५०० रुपयांप्रमाणे विमा जाहीर केला होता, मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात ‘झिरो बॅलन्स’ आहे. ही रक्कम तात्काळ जमा व्हावी.
जर शासनाने २५ एप्रिलपर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर तालुक्यातील शेतकरी आपल्या मुलाबाळांसह रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करणार आहेत. तसेच, उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणही सुरू करण्यात येणार असून, मागणी मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवेदनावर राजू साहेबराव वानखडे यांच्यासह नंदकिशोर बबानिया, सुरेश तिवारे, हरीभाऊ वानखडे, अनिल देवगीरकर, जगदीश जोगळे, प्रफुल्ल मालधुरे, इरफान खान, गोपाल खंडारे, रमेश गोपकर, मनिष मुंदडा, विष्णुपंत चुडे, महेंद्र ठाकरे, अजय हांडे, संदीप ठाकरे, अनंत शेटे, गजानन गाडवे, रितेश लाहे, गोपाल मानकर, हरिनाम सिंह बाजहिरे, गिरधारी जाधव, मोहन मानकर, मुन्ना नाईकनवरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी अकोला आणि तहसीलदार मुर्तिजापूर यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



