पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित विकासकामांना ‘स्थायी’ची मंजुरी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १६ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेशी संबंधित कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण सभेला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, नवीन थेरगाव गावठाण येथे ३४० खाटांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी फर्निचर खरेदीस मंजुरी देण्यात आली. तसेच आकुर्डी येथील कुटे रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयातील क्ष-किरण विभागासाठी बॅटरी खरेदी आणि ‘वायसीएम’ रुग्णालयात मानधन तत्त्वावर पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली.
-
सिग्नल फ्री चौक: पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नल फ्री करण्यासाठी आणि पिंपळे गुरव येथील कल्पतरू चौकात सबवे उभारण्यासाठी सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली.
-
रस्ते डांबरीकरण: सांगवी-किवळे रस्ता, निगडी टिळक चौक ते दुर्गानगर रस्ता, तसेच चिखली, मोशी, जाधववाडी, रावेत आणि वाकड परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली.
-
झोपडपट्टी विकास: सिद्धार्थनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर यांसह विविध झोपडपट्टी भागांत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत गटर, स्टॉर्म वॉटर लाईन आणि शौचालयांची दुरुस्ती केली जाणार आहे.
महापालिका शाळांच्या कामकाजासाठी १३८ डेटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईच्या खर्चाला मान्यता मिळाली. महापालिकेचा विकास आराखडा मराठी भाषेत प्रसिद्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.
शहरातील शौचालय साफसफाई करणाऱ्या महिला बचत गटांच्या कराराला ११ महिन्यांची मुदतवाढ देऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. तसेच १७ शाळांमध्ये ‘शून्य कचरा प्रकल्प’ राबविण्यासाठी आसरा सोशल फाऊंडेशनला मान्यता देण्यात आली.
याशिवाय, पीएमपीएमएलची संचलन तूट भरून काढण्यासाठी अनुदान देणे, अग्निशमन वाहनांची दुरुस्ती, आणि रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे फायर सेफ्टी ऑडिट यांसारख्या तांत्रिक व प्रशासकीय विषयांनाही स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


