प्रशासनाच्या ‘गलथान’ कारभारामुळे माजी नगरसेवकावर उपोषणाची वेळ; रावेत-किवळेतील नदी प्रदूषणावरून महापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , १६ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
रावेत: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू असताना विकासकामांचा बोजवारा उडाला असून, मूलभूत सुविधांसाठीही लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. रावेत-किवळे भागातील पवना नदीत मिसळणारे प्रदूषित सांडपाणी रोखण्यासाठी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी पुकारलेले आमरण उपोषण महापौरांच्या मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना आणि मुक्या प्राण्यांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
रावेत आणि किवळे परिसरात पवना नदीपात्रात थेट सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे नदी प्रदूषित होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. प्रशासकीय राजवटीत अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
उोषणाची दखल घेत महापौर रवि लांडगे यांनी बुधवारी (१५ एप्रिल) स्वतः उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून कडक शब्दांत तंबी दिली. “येत्या १५ दिवसांच्या आत पवना नदीत सांडपाणी सोडणे तातडीने बंद करावे,” अशा स्पष्ट सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापौरांच्या या ठोस आश्वासनानंतर तुकाराम भोंडवे यांनी त्यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण मागे घेतले.
या आंदोलनामुळे महापालिकेतील प्रशासकीय कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “गेल्या तीन वर्षांपासून शहरात प्रशासक राज सुरू आहे, मात्र या काळात विकासकामांना गती मिळण्याऐवजी ती ठप्प झाली आहेत. सामान्य जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांसाठीही जर माजी नगरसेवकांना उपोषण करावे लागत असेल, तर प्रशासनाचा कारभार किती गलथान आहे हे स्पष्ट होते,” अशी टीका बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापौरांनी दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत प्रशासन काय पावले उचलते, याकडे आता संपूर्ण रावेत-किवळे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जर दिलेल्या वेळेत काम झाले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


