news
Home अकोला साक्षगंधाच्या विधीत प्रशासनाचा ‘दणका’! अकोल्यात बालविवाह रोखला, पालकांकडून लिहून घेतले हमीपत्र

साक्षगंधाच्या विधीत प्रशासनाचा ‘दणका’! अकोल्यात बालविवाह रोखला, पालकांकडून लिहून घेतले हमीपत्र

२७ वर्षीय व्यक्तीसोबत होणार होता विवाह; जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि सामाजिक संस्थेची तत्परता | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अकोट तालुक्यात प्रशासनाची धाडसी कारवाई; १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश

अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, १७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला: अकोट तालुक्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २७ वर्षीय तरुणासोबत होणारा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन आणि ‘ॲसेस टू जस्टीस’ (आय.एस.डब्ल्यू.एस.) अकोला यांच्या संयुक्त पथकाने ही धाडसी कारवाई केली.

अकोट तालुक्यात एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह एका २७ वर्षीय व्यक्तीसोबत निश्चित करण्यात आला होता. या विवाहाची माहिती बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव यांना मिळताच त्यांनी तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. साक्षगंध विधीचा कार्यक्रम पार पडण्याच्या बेतात असतानाच सुनील सरकटे, हर्षाली गजभिये आणि शंकर वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने मुलीच्या पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ बद्दल सविस्तर माहिती दिली. मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य असल्याचे समजावून सांगितले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी दोन्ही बाजूंच्या मंडळींचे समुपदेशन केले. अल्पवयातील विवाहामुळे मुलीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून दिले.

हे प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. “मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न लावणार नाही,” अशा आशयाचे कायदेशीर हमीपत्र दोन्ही बाजूंच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांना साक्षीदार म्हणून घेण्यात आले.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बालविवाह लावून देणाऱ्या किंवा त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो. बालविवाहाची माहिती मिळाल्यास चाईल्ड लाईन (१०९८), पोलीस मदत (११२) किंवा बचपन बचाव आंदोलन (१८००१०२७२२२) या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

ही यशस्वी कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, सुनील सरकते आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने केली असून, त्यांच्या तत्परतेमुळे एका बालिकेचे भविष्य अंधकारात जाण्यापासून वाचले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!