देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणामुळे महाराष्ट्र नासवला; अशोक खरात प्रकरणावरून श्याम मानव यांचा घणाघात
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी विलास सावळे, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: “राज्यातील जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी रोखून आणि भोंदू बाबांना राजाश्रय देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवण्याचे काम केले आहे. जर हा कायदा नीट राबवला असता, तर अशोक खरातसारख्या बाबांनी महिलांचे शोषण करण्याचे धाडस केले नसते. या सर्व पापाला फडणवीस जबाबदार असून इतिहासात त्यांची नोंद ‘खलपुरुष’ म्हणून होईल,” अशा अत्यंत कडक शब्दांत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी प्रहार केला.
अमरावती येथील सांस्कृतिक भवनात आयोजित ‘विवेकवादी आणि प्रागतिक संघटनांच्या’ संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार बळवंत वानखडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. बबनराव बेलसरे, प्रा. प्रेमकुमार बोके, सीमा बोके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अशोक खरातवरील कारवाईचा उलगडा करताना श्याम मानव म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि त्यांचे ३९ आमदार या बाबाचे भक्त होते. सत्तेच्या बळावर या बाबाला मोठे करण्यात आले. मात्र, आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या गटाला राजकीय इशारा देण्यासाठीच जाणीवपूर्वक खरातवर कारवाई करण्यात आली. मुळात या बाबाचा प्रचार करणाऱ्या रूपाली चाकणकर आणि ३९ मंत्र्यांवरही जादूटोणाविरोधी कायद्यानुसार ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद लागू होते, मग त्यांच्यावर कारवाई का नाही?”
धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि प्रदीप मिश्रा यांसारख्या वादग्रस्त बाबांना देवेंद्र फडणवीस स्वतः महाराष्ट्रात फिरवतात, असा आरोप मानवांनी केला. “धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. उलट त्याला सरकारी संरक्षण दिले गेले. प्रदीप मिश्रा तर बेलपत्र चिटकवून मुलगा पास होतो, अशा अंधश्रद्धा पसरवतो; पण त्याचा स्वतःचा मुलगा नापास झाला. असे लोक जनतेला लुटत असताना फडणवीस मात्र त्यांना मोठे करत आहेत,” असेही ते म्हणाले.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रसारासाठी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी निधी मंजूर केला होता. मात्र, सरकार बदलल्यानंतर फडणवीसांनी तीन वर्षे हा जीआर (GR) निघू दिला नाही. “या कामासाठी माझ्याकडे १० टक्के लाचेची मागणी करण्यात आली. ही लाच मागण्याची हिंमत प्रशासनात कशी आली?” असा संतप्त सवाल श्याम मानव यांनी उपस्थित केला.
राजकारणात फडणवीस कोणत्या थराला जाऊ शकतात, हे सांगताना मानवांनी अनिल देशमुखांचे उदाहरण दिले. “आदित्य ठाकरेंविरुद्ध खोटे प्रतिज्ञापत्र लिहून देण्यास नकार दिल्याने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला ११ महिने जेलमध्ये डांबण्यात आले. फडणवीस केवळ स्वतःच्या सत्तेसाठी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गढूळ करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत, संजय देशमुख, शेखर पाटील, आशिष कडू, साहेबराव विधळे यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
