“उपेक्षित व मागास घटकांसाठी ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण म्हणजे नवसंजीवनी; निगडीत मातंग समाजाची एकजूट”
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: आरक्षणातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, अनुसूचित जातीतील उपेक्षित व वंचित घटकांसाठी ती एक ‘नवसंजीवनी’ आहे. आरक्षणाचा खरा लाभ समाजातील तळागाळातील आणि मागे राहिलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे उपवर्गीकरण अत्यावश्यक आहे, असा सूर निगडी येथे आयोजित मातंग समाजाच्या भव्य बैठकीत उमटला.
निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारकापाशी आज मातंग समाजाच्या पुढाकारातून आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते, विविध सामाजिक-राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनेक नेत्यांनी सांगितले की, आजवर आरक्षणाचे फायदे काही मोजक्याच घटकांपर्यंत मर्यादित राहिले आहेत. समाजातील इतर मागास व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. हा लढा केवळ एका जातीपुरता नसून, तो सर्व वंचित घटकांच्या हक्कांसाठीचा व्यापक सामाजिक संघर्ष आहे. पक्षभेद आणि गट-तट बाजूला ठेवून समाजहितासाठी सर्वांनी एकदिलाने लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या बैठकीस विधानपरिषद आमदार अमित गोरखे, नगरसेवक बापूसाहेब घोलप, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, संजय धुतडमल, डी. पी. खंडाळे, अरुण जोगदंड, युवराज दाखले, अनिल गायकवाड, राजू आवळे यांच्यासह विशाल कसबे, बाबा रसाळ, कृष्णा साबळे, शिवाजी खडसे, आशाताई शहाने, उषा माई कांबळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सामाजिक न्यायाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात जनजागृती मोहिमा, भव्य सभा आणि शासन दरबारी पाठपुरावा अशा विविध स्तरांवर लढा उभारला जाईल. “पिंपरी-चिंचवड शहरातून सुरू झालेली ही एकजूट आगामी काळात राज्यभरात आंदोलनाचे रूप धारण करेल,” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
“आरक्षणात समता हवीच” या घोषणेने निगडी परिसर दणाणून गेला होता. शासनाने जर या प्रश्नावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा संजय धुतडमल आणि युवराज दाखले यांनी यावेळी दिला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


