अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन अभ्यासदौऱ्याची सुवर्णसंधी; २० ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांतील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात होत असलेले आधुनिक बदल, नवनवीन संशोधन आणि विकसित होणारे प्रगत तंत्रज्ञान आपल्या राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
परदेशातील नामांकित कृषी शास्त्रज्ञ व स्थानिक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी. परदेशातील कृषी संशोधन संस्था, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि प्रक्रिया उद्योगांची प्रत्यक्ष पाहणी. परदेशी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीतील उत्पादन खर्च कमी कसा करावा व उत्पन्न कसे वाढवावे, याचे प्रात्यक्षिक ज्ञान.
अर्जदार व्यक्ती स्वतः शेतकरी असावी आणि शेती हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असावे (याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे अनिवार्य).अर्जदाराकडे ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असणे आवश्यक आहे. सहलीच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे आणि त्यांच्याकडे वैध पासपोर्ट (Passport) असणे आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबामधून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खाजगी संस्थेत नोकरीला नसावा. अर्जासोबत वैध ओळखपत्राची प्रत जोडणे बंधनकारक आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
