news
Home पिंपरी चिंचवड महावितरणच्या आशीर्वादानेच रिव्हर रोडवर वीज चोरी? उघड्या डी.पी. मुळे अपघाताची भीती

महावितरणच्या आशीर्वादानेच रिव्हर रोडवर वीज चोरी? उघड्या डी.पी. मुळे अपघाताची भीती

प्रामाणिक ग्राहकांवर कारवाई, मग चोरांना अभय का? सुहास कुदळे यांनी महावितरणच्या कारभाराचे काढले वाभाडे | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

खराळवाडी विभागात महावितरणची वीज चोरीकडे डोळेझाक; अधिकारी आणि वीज चोरांचे साटेलोटे?

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २९ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी कॅम्प, रिव्हर रोड परिसरात महावितरणच्या डी.पी. बॉक्समधून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. विशेष म्हणजे, या वीज चोरीबाबत वारंवार तक्रारी करूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने, “महावितरणचे अधिकारी आणि वीज चोर यांच्यात संगणमत तर नाही ना?” असा संतप्त सवाल जनसेवक सुहास कुदळे यांनी उपस्थित केला आहे.

रिव्हर रोड परिसरातील डी.पी. बॉक्स उघडे असून त्यातून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेतल्याचे विदारक दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. एकीकडे महावितरण सर्वसामान्य नागरिकांकडून थकीत बिलांची वसुली करण्यासाठी कडक पावले उचलते, वीज कनेक्शन कापण्याची कारवाई करते; मात्र दुसरीकडे सरेआम वीज चोरी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई का होत नाही? असा प्रश्न कुदळे यांनी विचारला आहे. वीज चोरी रोखण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, ज्याचा बोजा शेवटी इमानदार ग्राहकांवर पडतो.

अनेक नागरिकांनी या वीज चोरीबाबत महावितरणकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, अधिकाऱ्यांकडून मिळणारे दुर्लक्ष संशयास्पद आहे. “वीज चोरी रोखली जात नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होत नाही, याचा अर्थ नक्कीच कुठे तरी पाणी मुरत आहे,” असा गंभीर आरोप सुहास कुदळे यांनी केला आहे. खराळवाडी विभागातील या अनागोंदी कारभारामुळे परिसरात संतापाची लाट आहे.

महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीची दखल घेणार का? आणि दोषी अधिकारी व वीज चोरांवर कायदेशीर कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!