news
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत माता रमाईंच्या भव्य स्मारकाचा श्रीगणेशा! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरीत माता रमाईंच्या भव्य स्मारकाचा श्रीगणेशा! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे पिंपरीत दिमाखदार भूमिपूजन संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रमाईंचा त्याग आणि समर्पणच बाबासाहेबांच्या कार्यामागची खरी ताकद; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , २९ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर या त्याग आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान आणि स्वाभिमान दिला, पण त्या महान कार्यासाठी लागणारी नि:स्वार्थ ताकद रमाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. म्हणूनच हे स्मारक केवळ एक वास्तू नसून स्त्रीशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान ठरेल,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी’ प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. २८ एप्रिल) आठवले यांच्या हस्ते व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. महापौर रवी लांडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत शायरी करत आठवले यांनी उपस्थितांची मने जिंकली.

‘बाबासाहेबांकडे नव्हती पैशांची कमाई, पण त्यांच्या मागे उभी होती रमाई’

‘माझा भीम आहे चमकता तारा, त्याचा अपमान केला तर वाजवू बारा’

अशा शब्दांत त्यांनी महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा दिला. “आज आपण कोणत्याही शाळेत सन्मानाने बसू शकतो, हा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिला आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात महापुरुषांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी उभी राहिलेली स्मारके खरोखरच अनुकरणीय आहेत. जेव्हा लोक मला बाबासाहेबांच्या पुतळ्याबाबत विचारतात, तेव्हा मी त्यांना पिंपरीतील भीमसृष्टी पाहण्याचा सल्ला देतो. माता रमाईंच्या या भव्य स्मारकामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडली आहे.

महापौर रवी लांडगे यांनी सांगितले की, माता रमाईंच्या या सृष्टीसाठी कार्यकर्त्यांनी तब्बल १५ वर्षे सातत्याने लढा दिला. सुमारे २७ कोटी रुपये खर्च करून साकारले जाणारे हे देशातील माता रमाईंचे पहिलेच भव्य स्मारक आहे. याच ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचेही एकत्रित स्मारक साकारले जात आहे.

या सोहळ्यास आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, माजी मंत्री विजय गिरकर, माजी महापौर योगेश बहल, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने भीमसृष्टी परिसर भारावून गेला होता. त्यांच्या प्रेरणादायी गीतांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाडप्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार धर्मपाल तंतरपाळे यांनी मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!