news
Home पिंपरी चिंचवड आरक्षणाच्या हक्कासाठी मातंग समाज एकवटला! अमरावतीत ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरणावर मंथन

आरक्षणाच्या हक्कासाठी मातंग समाज एकवटला! अमरावतीत ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरणावर मंथन

बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी; १ मे पासूनच्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावतीत सकल मातंग समाजाची ‘महाचर्चा’ संपन्न; अनुसूचित जातीच्या अ-ब-क-ड वर्गीकरणासाठी रणनीती तयार

अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, २९ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: अनुसूचित जातीच्या (SC) अ-ब-क-ड वर्गीकरणाच्या मागणीला गती देण्यासाठी आणि आगामी जनगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी अमरावती येथे सकल मातंग समाजाच्या वतीने विशेष ‘महाचर्चा’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृह (चपराशीपुरा) येथे पार पडलेल्या या बैठकीत समाजाच्या आरक्षणाबाबतच्या पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यात आली.

राज्य समन्वयक देवलाल अवचार यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मातंग समाजाच्या भावी पिढीचा विकास, शिक्षण आणि नोकरीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले वर्गीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “सरकारने बदर समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच या अहवालाबाबत काही हरकती असल्यास त्या ३० एप्रिल २०२६ पर्यंत नोंदवण्याचे आवाहन समाज बांधवांना केले.

येत्या १ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली माहिती अचूकपणे भरून ती अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावी, जेणेकरून शासनाकडे समाजाची खरी आकडेवारी पोहोचेल आणि न्याय मिळण्यास मदत होईल, असे ठरवण्यात आले.

लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ प्रमुख डॉ. रुपेश खडसे यांनी गेल्या १३ वर्षांतील संघर्षाचा आढावा मांडला. उपवर्गीकरणासाठी कधी पोतराज बनून, कधी कैदी बनून तर कधी आमरण उपोषण व पदयात्रांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनांचा इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर ठेवला.

या महाचर्चेत ज्ञानेश्वर झोंबडे, बी. टी. अंभोरे, देविदास गायकवाड, अरुण सरकटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे सर्वानुमते ठरले असल्याची माहिती प्रवक्ता विजय जोंधळेकर यांनी दिली. बदर समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील मोठ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

या सत्राच्या यशस्वीतेसाठी गणेशदास गायकवाड, आकाश खडसे, प्रतीक शिंदे आणि समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर झोंबाडे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!