देहूरोडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौघांना ‘दुहेरी जन्मठेप’; पिंपरी चिंचवड न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , ११ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: देहूरोड परिसरात सन २०२१ मध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या चार नराधमांना पिंपरी चिंचवड येथील विशेष न्यायालयाने ‘दुहेरी जन्मठेपे’ची (Double Life Imprisonment) कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांच्या भक्कम तपासाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा मोठा विजय मानला जात आहे.
सन २०२१ मध्ये आरोपींनी पीडित तरुणीवर संगनमताने वारंवार अत्याचार केला होता. आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची भीती घालून पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३७६ (डी), ३७७, १२० (ब), ५०६ आणि आयटी ॲक्ट तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान, सुलतान ऊर्फ मुश्ताक सलीम सय्यद, रियाज ऊर्फ मन्नान जावेद खान, सोहेल शेरअली पीरझादे हे या गुन्ह्यात दोषी ठरवलेले आरोपी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त संजय नाईकपाटील यांनी केला होता. पोलिसांनी न्यायालयात वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पाटील यांनी काम पाहिले. साक्षीदार शेवटपर्यंत फितूर न झाल्याने आणि पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांची साखळी जोडल्याने न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण करण्यात आला. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपणर आणि देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने या खटल्याचा सातत्याने पाठपुरावा केला.
या गुन्ह्यात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमृत निंबाळकर, महिला पोलीस हवालदार आशा घाटे, पोलीस शिपाई सचिन पतुरे यांनी साक्षीदार आणि फिर्यादी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
