क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवडचा देशभर नावलौकिक व्हावा – खासदार श्रीरंग आप्पा बारणे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ११ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी चिंचवड ही नगरी कबड्डी खेळाची पंढरी आहे. येथून जास्तीत जास्त राष्ट्रीय खेळाडू घडावेत आणि क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नावलौकिक देशभर व्हावा,” असे प्रतिपादन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले. प्रो कबड्डीसारख्या व्यासपीठामुळे खेळाडूंना आता मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून, भविष्यात अधिकाधिक युवकांनी या क्षेत्रात यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ ला खासदार बारणे यांनी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यात खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारांत चमकलेल्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. विजय यादव (बॉक्सिंग, १९९७-९८), पूजा शेलार (कबड्डी, २०१५-१६), राजू घुले (कबड्डी), मीनाक्षी शिंदे (सायकलिंग, २००३-०४), वैष्णवी जगताप (जलतरण, २०२०-२१), विराज लांडगे (कबड्डी, २०२३-२४) या खेळाडूंचा समावेश होता.
याप्रसंगी महापौर रवि लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य तथा शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, निलेश तरस, सुलभा उबाळे, उपायुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे आणि अरुण कडूस यांच्यासह क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळत असून, अशा स्पर्धांमधून उद्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


