news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड भाजपच्या प्रभारीपदी अ‍ॅड. भरत पाटील यांची एन्ट्री! मोरवाडीत संघटनात्मक बांधणीवर भर

पिंपरी-चिंचवड भाजपच्या प्रभारीपदी अ‍ॅड. भरत पाटील यांची एन्ट्री! मोरवाडीत संघटनात्मक बांधणीवर भर

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी रणनीती तयार; कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्रिय होण्याचे अ‍ॅड. पाटील यांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही – अ‍ॅड. भरत पाटील

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “राजकारणात काम करत असताना पक्ष संघटना ही नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीही नाही, ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याने मनाशी पक्की बाळगली पाहिजे,” असे ठाम प्रतिपादन भाजपचे नवनियुक्त शहर प्रभारी अ‍ॅड. भरत पाटील यांनी केले.

मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अ‍ॅड. पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर, आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पहिलीच मोठी बैठक पार पडली.

अ‍ॅड. भरत पाटील यांनी शहरातील पक्षाच्या कामकाजाचा, विविध सेल आणि आघाड्यांच्या सक्रियतेचा सविस्तर आढावा घेतला. आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ स्तरावर काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, सतत जनतेच्या संपर्कात राहून पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे म्हणाले की, “शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासोबतच सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन आम्ही जनसेवेचे व्रत घेतले आहे. कार्यकर्त्यांचे कष्ट आणि जनतेचा विश्वास हीच भाजपची खरी ताकद आहे.” आमदार अमित गोरखे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटनात्मक बांधणीवर भर दिला.

या बैठकीला शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये, अनुप मोरे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, दिनेश यादव यांसह सर्व जिल्हा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस उपस्थित होते.

या बैठकीमुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!