news
Home पिंपरी चिंचवड पुण्यात कैद्याचे ‘फिल्मी’ स्टाईल पलायन! येरवडा कारागृहातून जन्मठेपेचा आरोपी गायब

पुण्यात कैद्याचे ‘फिल्मी’ स्टाईल पलायन! येरवडा कारागृहातून जन्मठेपेचा आरोपी गायब

मोबाईल सापडल्यानंतर कारवाईच्या धसक्याने संतोष भिंगारे फरार; पोलिसांची पथके सातारा-वाईच्या दिशेने रवाना | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पसार; मोबाईल सापडल्याच्या चौकशीच्या भीतीने पलायन

पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, ११ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शेती विभागात काम करणारा आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी शुक्रवारी (८ मे २०२६) सायंकाळी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. कारागृह परिसरात सापडलेल्या एका बेवारस मोबाईल संदर्भात आपली चौकशी होऊन पुन्हा बंदिस्त कारागृहात रवानगी होईल, या भीतीने त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

फरार कैद्याचे नाव संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे आहे. संतोषला सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे १९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याची रवानगी कोल्हापूर खुल्या कारागृहातून येरवडा खुल्या कारागृहात करण्यात आली होती. येथे तो कारागृहाच्या केशकर्तनालयात (सैलून) काम करत होता.

शुक्रवारी दुपारी कारागृह अधिकारी शेती विभागाची पाहणी करत असताना त्यांना तुती बागेजवळ एक सिमकार्ड नसलेला मोबाईल आढळून आला. या मोबाईलबाबत संशयावरून संतोष भिंगारे आणि अन्य एका कैद्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.  सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास “मी जेवण करून येतो,” असे सांगून संतोष बराकीकडे जाण्यासाठी निघाला. मात्र, तो परतलाच नाही. बराच वेळ झाला तरी तो न आल्याने शोध घेतला असता तो पसार झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी तुरुंगाधिकारी नागनाथ महादेव भानवसे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुणे पोलिसांनी रेल्वे स्टेशन, एसटी स्थानके आणि संशयित ठिकाणी शोध पथके रवाना केली आहेत. उघड्या कारागृहात भिंती नसल्याचा फायदा घेऊन त्याने पलायन केले. पोलीस उपनिरीक्षक सत्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!