news
Home पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा हुंकार! ॲड. अजित बोराडे यांनी उलगडले कायद्याचे महत्त्व

चिंचवडमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा हुंकार! ॲड. अजित बोराडे यांनी उलगडले कायद्याचे महत्त्व

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 'सहकार भूषण' व 'पत्रकारिता भूषण' पुरस्कारांचे वितरण; प्रशासकीय पारदर्शकतेसाठी सजग राहण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माहिती अधिकार हे भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र – ॲड. अजित बोराडे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: “सरकारी कार्यालयांत सामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक पाहता ही खरोखर जनतेची सत्ता आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. ही व्यवस्था बदलण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ‘माहिती अधिकार कायदा २००५’ हे सर्वसामान्यांच्या हातातील अत्यंत प्रभावी शस्त्र आहे,” असे प्रतिपादन सहकारतज्ज्ञ ॲड. अजित बोराडे यांनी केले. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी या कायद्याचा सजगपणे वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दक्ष नागरिक संघाच्या वतीने चिंचवड येथे रविवारी (दि. १०) आयोजित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महामेळावा व पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

ॲड. बोराडे पुढे म्हणाले की, माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढते. या कायद्यांतर्गत केवळ कागदपत्रेच नव्हे, तर सरकारी कामातील साहित्य, जसे की रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणारे सिमेंट, वाळू किंवा औषधांचे नमुने घेण्याचाही अधिकार नागरिकांना आहे. तसेच संबंधित कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष फाईल तपासणी करण्याची तरतूद असून, पहिल्या तासासाठी ही तपासणी पूर्णतः मोफत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते  संजीवन सांगळे ‘सहकार भूषण’ पुरस्कार, डॉ. सोनाली गेडाम-नागदेवते ‘विद्यारत्न’ पुरस्कार, आणि सुरज साळवे (पत्रकार): ‘पत्रकारिता भूषण’ पुरस्कार, समाजातील अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, माहिती अधिकार कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिक सत्तेच्या केंद्रस्थानी आला आहे. केवळ एका अर्जाद्वारे प्रशासकीय त्रुटी उघड करणे आता शक्य झाले आहे. मात्र, या कायद्याचा वापर विधायक कामांसाठीच व्हावा. काही लोक कायद्याचा चुकीचा वापर करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना बदनाम करतात, अशा वेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या चारित्र्यातील स्वच्छता जपणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमास कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, संजीवन सांगळे, राजू बनसोडे, निलेश हाके, ॲड. श्वेता मांडे-वैद्य, ज्ञानेश्वर नागरगोजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. श्वेता मांडे-वैद्य यांनी केले, तर विनोद क्षीरसागर यांनी प्रास्ताविक आणि निलेश हाके यांनी आभार मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!