news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत धार्मिक स्थळांवर सर्जिकल स्ट्राईक! मध्यरात्रीच्या मोहिमेने कुदळवाडी हादरली

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत धार्मिक स्थळांवर सर्जिकल स्ट्राईक! मध्यरात्रीच्या मोहिमेने कुदळवाडी हादरली

दगडफेक करून कारवाई रोखण्याचा प्रयत्न; मात्र चोख पोलीस बंदोबस्तात प्रशासनाचा हातोडा यशस्वी; आमदार महेश लांडगे यांचे कारवाईला समर्थन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कुदळवाडी-जाधववाडीत मध्यरात्री ‘धडक कारवाई’; दोन मंदिरे आणि दोन मशिदींवर फिरला महापालिकेचा हातोडा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध सोमवारी (११ मे २०२६) मध्यरात्री मोठी ‘धडक कारवाई’ केली. कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दोन मंदिरे आणि दोन मशिदींचे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटविण्यात आले. सुमारे ४ हजार ३३६ चौरस फूट क्षेत्रावरील हे अतिक्रमण काढताना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि संभाव्य प्रतिकार टाळण्यासाठी ही कारवाई मध्यरात्री १ ते पहाटे ५ या वेळेत करण्यात आली. गेल्या वर्षी याच अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावल्या तेव्हा स्थानिक नागरिकांनी मोठे निषेध मोर्चे काढले होते. त्यामुळे यावेळी महापालिकेने अत्यंत गोपनीयरीत्या आणि मोठ्या फौजफाट्यासह ही मोहीम राबवली.

 कुदळवाडीतील विसावा चौक ते पोलीस चौकी रस्ता, जाधववाडी रस्ता आणि सावता माळी मंदिर रस्ता परिसरातील अनधिकृत पत्राशेड, विटांचे बांधकाम आणि आरसीसी (RCC) बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. या मोहिमेसाठी सुमारे १,२०० पोलीस कर्मचारी, २१८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) जवान तैनात होते. १० पोकलेन मशिनी, १० जेसीबी, ५० मजूर, अग्निशमन दलाच्या ३ गाड्या आणि २ रुग्णवाहिकांचा ताफा घटनास्थळी हजर होता.

कारवाई सुरू असताना स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने जमा होऊन प्रशासनाचा निषेध केला. यावेळी संतप्त जमावाकडून झालेल्या दगडफेकीत महापालिकेच्या दोन जेसीबी मशिनींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून कारवाई पूर्ण केली.

महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ज्या धार्मिक स्थळांना कोणताही न्यायालयीन स्थगिती आदेश (Stay Order) नव्हता, केवळ अशाच बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित ३१ नोटिसांपैकी ज्या प्रकरणांत न्यायालयात किंवा अल्पसंख्याक आयोगाकडे दाद मागितली आहे, त्यांचा निर्णय झाल्यावर पुढील पाऊल उचलले जाईल.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या कारवाईचे समर्थन केले असून, “देशविरोधी प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या अनधिकृत स्थळांवर कारवाई होणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, नुकसान झालेल्या हिंदू धार्मिक स्थळांचे कायदेशीर जागेवर पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!