news
Home पिंपरी चिंचवड पीसीईटीचा ‘ग्लोबल’ कनेक्ट! यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठासोबत शैक्षणिक सहकार्याचा विस्तार

पीसीईटीचा ‘ग्लोबल’ कनेक्ट! यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठासोबत शैक्षणिक सहकार्याचा विस्तार

पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक संशोधनाची संधी; सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट यांच्या उपस्थितीत पीसीईटीमध्ये विशेष बैठक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पीसीईटी शिष्टमंडळाची बैठक संपन्न; जागतिक शैक्षणिक भागीदारीवर शिक्कामोर्तब

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी मजबूत जागतिक परिवर्तनकारी शैक्षणिक भागीदारी निर्माण करणे आवश्यक आहे. यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) यांच्यातील हे दृढ नाते भविष्यात दोन्ही संस्थांच्या विस्तारासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी मैलाचा दगड ठरेल,” असे मत ॲबरिस्टविथ विद्यापीठाचे सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट यांनी व्यक्त केले.

पीसीईटी आणि यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ यांच्यात २०२५ मध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा पुढचा टप्पा म्हणून आज पीसीईटीच्या कार्यालयात शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही संस्थांच्या शैक्षणिक सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भागीदारीमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी अनेक जागतिक संधी खुल्या होणार आहेत. पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळात दोन्ही संस्थांमार्फत  उच्च शिक्षण, कृषी, संशोधन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करणे,  दुहेरी पदवी (Double Degree) प्राप्त करणे, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि समर स्कूल उपक्रम,  विद्यार्थी व प्राध्यापक विनिमय (Exchange Program), क्रेडिट ट्रान्सफर आणि आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप उपक्रम राबविण्यात येतील.

या बैठकीसाठी यूकेमधून ॲबरिस्टविथ विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विभाग सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट, प्रादेशिक व्यवस्थापक सामंथा वॅलिन आणि सल्लागार झफीर आलम उपस्थित होते. पीसीईटीच्या वतीने ओ.एस.डी. डॉ. योगेश भावसार, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. निरुपमा कोचेरलाकोटा आणि डिजिटल मार्केटिंग विभागाच्या शुभांगी रामटेके यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यापूर्वी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि डॉ. गिरीश देसाई यांच्या उपस्थितीत या जागतिक कराराचा पाया रचला गेला होता. या नव्या भागीदारीमुळे पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या दारे अधिक सुलभतेने खुली झाली आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!