news
Home पिंपरी चिंचवड बाळासाहेबांच्या तसबिरीची विटंबना? पिंपरी पालिकेतील शिंदे गटाच्या कार्यालयात संतापजनक प्रकार

बाळासाहेबांच्या तसबिरीची विटंबना? पिंपरी पालिकेतील शिंदे गटाच्या कार्यालयात संतापजनक प्रकार

अडगळीच्या खोलीत धूळ खात पडला 'दैवता'चा फोटो; विश्वजीत बारणे लक्ष्य, तर सुलभा उबाळे यांच्या मौनावर शिवसैनिकांचे प्रश्नचिन्ह | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापाची लाट: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ‘अडगळीत’, शिंदे गटावर शिवसैनिकांचा प्रहार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून सामान्य कार्यकर्त्याला आमदार, खासदार आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवले, त्या शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या शिवसेना गटनेत्यांच्या कार्यालयाशेजारील एका अडगळीच्या खोलीत बाळासाहेबांचा फोटो धूळ खात पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे तमाम शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना स्वतंत्र कार्यालये देण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सात नगरसेवक असून विश्वजीत श्रीरंग बारणे हे या गटाचे गटनेते आहेत. मात्र, ज्यांच्या नावावर आणि फोटोवर आजवर राजकारण केले, त्याच बाळासाहेबांच्या तसबिरीला मुख्य कार्यालयात सन्मानाने स्थान देण्याऐवजी बाजूच्या भंगार आणि अडगळीच्या सामानासोबत ठेवण्यात आले आहे.

हा केवळ एका फोटोचा अपमान नसून बाळासाहेबांच्या विचारांचा आणि अस्मितेचा अपमान असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत. शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाला न्याय देणाऱ्या दैवताचा असा अपमान पाहून नागरिकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. “गटनेते विश्वजीत बारणे या अपमानाबद्दल शिवसैनिकांची माफी मागणार का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. सत्तेच्या उबेत बाळासाहेबांच्या उपकारांचा विसर पडला आहे का, अशी टीकाही निष्ठावान शिवसैनिकांकडून होत आहे.

या सर्व प्रकरणात शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि ‘पिंपरी-चिंचवडची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. सुलभाताई उबाळे यांच्या शांततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बाळासाहेबांच्या या विटंबनेवर त्या अद्याप आक्रमक का झाल्या नाहीत? त्या शांत का आहेत? असा सवाल निष्ठावान शिवसैनिकांकडून विचारला जात आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि इतर पक्षांची कार्यालये सुसज्ज असताना, शिंदे गटाच्या कार्यालयात बाळासाहेबांना मिळालेली ही वागणूक म्हणजे ‘कृतघ्नपणा’ असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. हा वाद येणाऱ्या काळात पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठे वळण घेण्याची शक्यता असून, शिवसैनिक यावर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!