चिंचवड भाजपमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर; रोजगार मेळाव्याच्या फ्लेक्सवरून शहराध्यक्षांचा फोटो ‘गायब’
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता फलकयुद्धाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य रोजगार मेळाव्या’च्या अधिकृत जाहिरात प्रसिद्धी पत्रकातून भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचा फोटो गायब असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आमदार शंकर जगताप यांच्या वतीने १४ मे २०२६ रोजी नवी सांगवी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत, मात्र शहराध्यक्षांचा फोटो डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.
शत्रुघ्न काटे यांनी शहरात ८४ नगरसेवक निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर चिंचवड विधानसभा उमेदवारीसाठी त्यांनी प्रबळ दावेदारी केली होती. मात्र, त्यावेळी त्यांची समजूत काढून त्यांना शहराध्यक्षपद देण्यात आले. आगामी निवडणुकीत काटे हे पुन्हा एकदा प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत. यामुळेच आमदार शंकर जगताप गटाकडून त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा रंगली आहे.
काटे समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. ८४ नगरसेवक निवडून आणूनही काटे यांना महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर ठेवण्यात आले. तसेच स्थायी समिती अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असतानाही अंतर्गत राजकारणामुळे त्यांना या पदाने हुलकावणी दिली. आता थेट शहराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलून फोटो वगळल्याने ही ‘पंख छाटणी’ तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हा वाद समोर येत असतानाच, नवनियुक्त शहर प्रभारी अॅड. भरत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत “पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही” असा इशारा दिला होता. मात्र, एका बाजूला शिस्तीच्या गप्पा आणि दुसऱ्या बाजूला थेट शहराध्यक्षांनाच डावलले जाणे, यामुळे भाजपमधील गटबाजी आता लपून राहिलेली नाही.
एकीकडे बापू काटे यांनी सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जनसेवा करण्याचे व्रत घेतल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे त्यांना डावलल्यामुळे येणाऱ्या काळात चिंचवडच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
